एकनाथ शिंदेंना आव्हान देऊ पाहणाऱ्या अमित घोडांनी घेतला हा निर्णय - Former MLA Amit Ghoda upset with Shiv Sena; Wife resigns as ZP member-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

एकनाथ शिंदेंना आव्हान देऊ पाहणाऱ्या अमित घोडांनी घेतला हा निर्णय

महेंद्र पवार 
बुधवार, 21 जुलै 2021

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला पाठ दाखवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कासा (जि. पालघर) : पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय नाट्य मोठ्या प्रमाणत घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीनाट्य शमल्यानंतर आता शिवसेनेत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा सदस्य बिनविरोध निवडून आला असला तरी शिवसेनेतील नाराजी मात्र त्यातून बाहेर आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या अमिता घोडा यांनी  मंगळवारी (ता. २० जुलै) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला पाठ दाखवून आपली नाराजी व्यक्त केली असतानाच त्यांनी आज जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. (Former MLA Amit Ghoda upset with Shiv Sena; Wife resigns as ZP member)

राज्यात शिवसंपर्क अभियान सुरु असतानाच शिवसेनेत नाराजीनाट्य घडत असल्याने त्याचा फटका पालघर जिल्ह्यातील शिवसेनेला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
            
हेही वाचा : भाजप धक्का देण्याचा धसका : तीन मंत्री, दोन खासदार, पाच आमदार होते टेन्शनमध्ये

महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान सुरु आहे. यात विविध कार्यक्रम राबवून जुने निष्ठावान शिवसैनिकांशी तसेच विविध भागात भेटी देऊन संवाद साधला जात आहेत. अनेक शाखांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. पण, पालघर जिल्ह्यात मात्र माजी आमदार अमित घोडा यांनी आपल्याला पक्षात डावलले जात असल्यामुळे नाराज असल्याचे सांगून आपली पत्नी अमिता घोडा जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. या नाराजी नाट्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना पक्षाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. 

माजी आमदार अमित घोडा हे (कै.) कृष्णा घोडा यांचे पुत्र असून त्यांच्या निधनानंतर पालघर विधानसभेची अनेक कामे मार्गी लावली आहेत, असे असतानाही त्यांना पालघरमधून आमदारकीचे तिकीट नाकारले होते. तेव्हा त्यांना पक्षात एखादे पद दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण ते हवेतच विरले. तसेच, त्यांना पक्षातील कोणत्याही संघटनात्मक कार्यक्रमास बोलावले जात नाही. पालघर जिल्हा शिवसेनेतील जुने निष्ठावंत पदाधिकारी यांनासुद्धा पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना आमंत्रण दिले जात नसल्याने नाराजी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागू शकते.

जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे, असे शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. यामुळे शिवसेनेत धुमसत असलेले नाराजीनाट्य लवकर शमविले नाही, तर जिल्ह्यात मोठी फाटाफूट होऊन पक्षाला मोठा फटका बसू शकतो.
         
माजी आमदार अमित घोडा हे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत त्यांना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मदत केली होती. निवडणुकीनंतर घोडा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या पॅनेलला पाठींबा दिल्याने ते थेट बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान असल्याचे मानले जात असल्याने त्यांना शिवसेनेत अडगळीत टाकण्याची खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज अमित घोडा बहुजन विकास आघाडीकडे जातात की पुन्हा एकदा आपल्या जुन्या घरी म्हणजेच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतात, हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख