भाजप धक्का देण्याचा धसका : तीन मंत्री, दोन खासदार, पाच आमदार होते टेन्शनमध्ये - Vaidehi Wadhan as Palghar ZP President; Dnyaneshwar Sambre as Vice President-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजप धक्का देण्याचा धसका : तीन मंत्री, दोन खासदार, पाच आमदार होते टेन्शनमध्ये

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ निर्माण झाली होती.

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या वैदेही वाढाण; तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीसाठी तीन मंत्र्यांनी व जिल्ह्यातील सर्व घटक पक्षांच्या आमदार-खासदारांनी आज (ता. २० जुलै) पालघरमध्ये हजेरी लावली होती. (Vaidehi Wadhan of Shiv Sena as Palghar ZP president; NCP's Dnyaneshwar Sambre as Vice President)

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते. भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा हालचाली सुरू होत्या. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे, ठाण्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या तीन मंत्र्यांसह दोन खासदार आणि पाच आमदार टेन्शनमध्ये होते. मात्र, या निवडीसाठी हजेरी लावत त्यांनी वेळी चक्रे फिरवली आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आली. 

हेही वाचा : भाजप नेते, झेडपीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश 

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज २० जुलै रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या वैदही वाढाण; तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले व उपाध्यक्ष पदासाठी महेंद्र भोणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी आज दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेची खास सभा आयोजित करण्यात आली होती. 

निवडणुकीचे काम सुरू होताच भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले व सभात्याग करून भाजपचे आठही सदस्य सभागृहाबाहेर पडले. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट 

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ निर्माण झाली होती. भाजपचे आठ सदस्य असल्याने काही घटक पक्षांशी युती करून शिवसेनेला दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे महाविकास आघाडीला दगाफटका बसू नये; म्हणून या निवडणुकीकडे सर्वच घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. 

गटबाजीमुळे वरिष्ठांची उपस्थिती

पालघर जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडीच्या या निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार राजेंद्र गावित, खासदार राजेंद्र विचारे, आमदार सुनील भुसारा, आमदार विनोद निकोले, आमदार राजेंद्र पाटील, आमदार श्रीनिवास वनगा व आमदार रवींद्र फाटक उपस्थित राहिले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख