सहकारमंत्र्यांचे आदेश : ‘नासाका’ची सात दिवसांत ई-निविदा‘  - Co-operative minister ordered E tender for nashik Sugar, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

सहकारमंत्र्यांचे आदेश : ‘नासाका’ची सात दिवसांत ई-निविदा‘ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

गेल्या सात ते आठ वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सात दिवसांत ई-निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

नाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik co-operative Sugar Factory closed due to financial crisis) सुरू करण्यासाठी सात दिवसांत ई-निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operative minister assured e tender process within a week) यांनी दिले आहेत. त्यामुळे साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी खासदार देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

साडे बाराशे टन गाळपक्षमता असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास १७ हजार सभासद आहेत. कारखाना सुरू असताना जिल्हा बॅंकेकडून कारखान्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर कारखाना बंद पडला आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला. कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकेने कारखान्यावर जप्तीही आणली होती. 

या सर्व प्रकारांमुळे कारखान्याचे जवळपास १३५ कामगार बेरोजगार झाले होते, तसेच ऊस उत्पादक हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. या अडचणींवर मात करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे व देवळाली मतदासंघाच्या आमदार सरोज आहिरे यांचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत होण्याकामी नुकतीच मंत्रालयात सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत माजी खासदार देवीदास पिंगळे व आमदार सरोज आहिरे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक, नासाका कर्मचारी संघटनेचे विष्णुपंत गायखे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. 

या वेळी सविस्तर चर्चा झाली होती. बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून, यात जिल्हा बँकेने सात दिवसांत ई-निविदा प्रक्रिया राबवावी, असे सहकारमंत्री पाटील यांनी आदेशित केले आहे. यामुळे शेतकरी व कारखाना कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या असून, माजी खासदार देवीदास पिंगळे व आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. यामुळे आहिरे व पिंगळे या द्वयींचे कौतुक केले जात आहे. 

ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून आमदार सरोज आहिरे व मी प्रयत्नशील आहे. कारखाना पूर्ववत झाल्यास शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सुटणार आहेत. नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या बळीराजाला कोरोनासारख्या महामारीचाही मोठा फटका बसला आहे. ऐन कोरोनाकाळात नासाका सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी हा सुखद धक्का आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शविल्याने आता नासाका प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, असे नाशिक बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी सांगितले.
...
हेही वाचा...

आमदार मौलाना मुफ्तींची स्थिती `नाचता येईना अंगण वाकडे`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख