जळगावमध्ये संजय राऊतांच्या विधानाची ठिणगी!

मविआचे शिल्पकार संजय राऊत आणि तिकडे विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र स्वबळाचा नारा देत होते. अशा वक्तव्यावरून लगेच काहीतरी मोठी राजकीय उलथापालथ घडेल, असे नाही. पण, राज्यातील आघाडी सरकारवर काही कारणावरून गंडांतर आलेच, तर त्याला संजय राऊत यांच्या खानदेश दौऱ्यातील वक्तव्याची ठिणगी कारणीभूत तर ठरणार नाही ना, याची चर्चा आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut

जळगाव : राष्ट्रवादीच्या स्थापनादिनी शरद पवार शिवसेनेशी विश्‍वासाच्या नात्याचे गोडवे गात असताना इकडे खानदेशात शिवसेना नेते व मविआचे शिल्पकार संजय राऊत (Sanjay Raut) आणि तिकडे विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) मात्र स्वबळाचा नारा देत होते. अशा वक्तव्यावरून लगेच काहीतरी मोठी राजकीय उलथापालथ घडेल, (Political vicissitude may happen In Future) असे नाही. पण, राज्यातील आघाडी सरकारवर काही कारणावरून गंडांतर आलेच, तर त्याला संजय राऊत यांच्या खानदेश दौऱ्यातील  वक्तव्याची ठिणगी कारणीभूत तर ठरणार नाही ना, याची चर्चा आहे.

गेला संपूर्ण आठवडा देश, राज्यव्यापी राजकीय घटनांनी ढवळून निघाला. राज्याच्या प्रश्‍नांसाठी ठाकरेंनी मोदींची भेट घेणे, भेटीनंतर स्वतंत्रपणे एकांतात बातचीत करण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व काल-परवा पवार व राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील भेटीलाही प्राप्त झालेय. विशेष म्हणजे, मोदी-ठाकरे भेटीनंतर लगेचच पवार व किशोर यांची भेट होणे, हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. त्यामागे पवारांचीही काही गणिते असतीलच. शिवाय, राष्ट्रवादीच्या स्थापनादिनी पवारांनी शिवसेनेच्या विश्‍वासाचे गोडवे गाण्यामागे मोदी-ठाकरे भेटीचा संदर्भ जोडला जाण्यातही काही गैर नाही. विशेष म्हणजे, आगामी निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याचे संकेतही पवारांनी यानिमित्ताने दिले. अर्थात, मनात असते ते पवारांच्या ओठावर कधीही येत नाही आणि जे ओठावर येते, त्याच्या नेमकी उलट त्यांची कृती असते.

पवारांच्या एवढे राज्यातील आघाडी सरकारचे शिल्पकार असलेल्या संजय राऊत यांनी मात्र खानदेश दौऱ्यात, विशेषत: जळगावातून आगामी वाटचालीचे संकेत देताना सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे असताना आता शिवसेनेचा खासदार जळगावातून देऊ, या राऊतांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे. सध्यातरी राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा भाजप हा एकमेव शत्रू आहे आणि असे असताना राऊतांनी खानदेशात व नाना पटोलेंनी विदर्भात स्वबळाचा नारा देणे आघाडी सरकारसाठी शुभ संकेत नक्कीच नाहीत. राऊतांच्या जळगाव जिल्ह्यातील दौऱ्याने व सत्तेत असल्यामुळे राबविल्या जाणाऱ्या आक्रमक धोरणाविरुद्ध विरोधी पक्ष भाजपला आपल्या रणनीतीत बदल करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, भाजपपेक्षाही मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या पोटात या दौऱ्यातील वक्तव्यांमुळे गोळा उठला आहे, हे नाकारून चालणार नाही.

लोकसभेच्या सार्वत्रिक व विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप तीन वर्षे असताना जिल्हा परिषद, महापालिकांपासून त्यांची चाचपणी होणार आहे आणि त्याआधीच राऊतांनी स्वबळाचा नारा दिला असेल तर सरकारसाठी हा धोका नसला तरी निवडणूकपूर्व आघाडीत यामुळे ठिणगी पडेल.

गुलामगिरी अन्‌ स्वाभिमान
जळगावच्या दौऱ्यात राऊतांनी फडणवीस सरकारमधील सेनेच्या गुलामगिरीचा कबुली जबाब दिला. खरेतर फडणवीसांचे सरकार सेनेच्या पाठिंब्याने आलेच नव्हते, सरकार स्थापनेनंतर शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. त्यामुळे सेनेला दुय्यम वागणूक भेटणे स्वाभाविकच होते. मात्र, राऊतांचा हा जबाब खरा मानला तर गुलामगिरीत सत्ता भोगणे सेनेसारख्या स्वाभिमानी पक्षाला का चालले? शिवाय, सत्तेत असून सरकारवर टीकेची एकही संधी न सोडता धमक्या देणाऱ्या सेना मंत्र्यांचे खिशातील राजीनामे बाहेर कधीच का आले नाहीत? याचाही जबाब राऊतांनी देणे अपेक्षित आहे.
-----
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com