नार-पारचे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविण्याचा ध्यास घ्या

महाराष्ट्राच्या भूमीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचाच हक्क आहे. त्यामुळे आज वापरात नाही म्हणून गुजरातला ह्या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. कितीही खर्च आला तरी हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्रात वळविण्याचा ध्यास घेऊन काम करण्याची गरज आहे
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : महाराष्ट्राच्या भूमीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचाच हक्क आहे. (Maharashtra had a right on Every Drop of rain water in state) त्यामुळे आज वापरात नाही म्हणून गुजरातला ह्या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. (Do not give rights to Gujrat For this Water) कितीही खर्च आला तरी हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्रात वळविण्याचा ध्यास घेऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेतर्फे १४ ते १७ मे अशी चार दिवसीय वर्च्युअल रॅली झाली. त्यामध्ये तिसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून श्री. भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, राजेंद्र जाधव, सुरेश पाटील, भिला पाटील यांनी याविषयावर भूमिका मांडली. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी विस्तृत विवेचन केले. 

श्री. भुजबळ म्हणाले, मांजरपाडा-१ या प्रकल्पाचे स्वप्न मी दहा वर्षापूर्वी बघितले होते. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दहा वर्ष अथक प्रयत्न करावे लागले. यावर्षी पावसाळ्यात दिंडोरी- चांदवड- येवला व त्यापुढील तालुक्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे `नार-पार`चे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे, हे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या मांजरपाडा प्रकल्पाकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून बघितले पाहिजे. अशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक ठिकाणी बोगदे करून समुद्राला वाहून व वाया जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणणे शक्य आहे. मात्र हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक ध्यास घेऊन सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नर्मदा-तापी खोऱ्यात गुजरातचा अन्याय
यावेळी जलतज्ञ राजेंद्र जाधव यांनी सांगितले की, नर्मदा-तापी खोऱ्यात महाराष्ट्रावर गुजरातने अन्याय करून कमी पाणी दिले आहे. महाराष्ट्राची भोगोलिक परिस्थिती विचित्र आहे. सातपुडापर्वत रांगेच्या उत्तर बाजूने नर्मदा वाहत असल्याने ते पाणी आपण वापरू शकत नाही. तसेच तापी नदी महाराष्ट्रात खालच्या लेव्हलला वाहते. तिच्या उपनद्या गिरणा- पांझरा-बोरी- बुराई उंचावरून वाहतात. त्यामुळे तापीच्या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला करावयाचा झाल्यास ते पाणी उकाई धरणातून लिफ्ट करून गिरणा-पांझरा-बोरी-बुराई या नद्यांमध्ये टाकावे लागेल. सबब उकाई धरणातून ५० टीएमसी पाणी लिफ्ट करण्याची मागणी केंद्र सरकार व गुजरात सरकारकडे केली पाहिजे.

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता एकूण पावसाच्या ५० टक्के पाऊस कोकणात पडतो व सर्व पाणी गुजरातकडे व समुद्राला वाहून जाते. त्यामुळे कोकणातील दमणगंगा-नार-पार-उल्हास-वैतरणा इत्यादी नदी खोऱ्यांचे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविणे आवश्यक आहे. या दृष्टीने ते स्वतः गेल्या बारा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राची आजची सिंचन क्षमता फक्त २३ टक्के आहे. देशात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील दीडशे तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. देशात सगळ्यात जास्त धरणे बांधून सुद्धा आपण महाराष्ट्राचा दुष्काळ दूर करू शकलेलो नाही. याउलट गुजरातने केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने २८० टीएमसी चे उकाई धरण व ३३५ टीएमसी चे सरदार धरण बांधून पूर्ण केले. त्यामुळे गुजरातची सिंचन क्षमता ५५ टक्के झाली. 

ते म्हणाले की, याव्यतिरिक्त दक्षिणेकडील दमणगंगा-नार-पार-पूर्णा-तापी-नर्मदेचे पाणी खंबाटच्या खाडीत नेऊन तिथे समुद्रात ३० किमी ची भिंत बांधून ३७० टीएमसी क्षमतेचे धरण बांधायचे, त्याच्या बाजूला चीन मधील शांघाय शहराच्या धरतीवर धोलेरा नावाचे जागतिक दर्जाचे शहर उभारायचे व संपूर्ण भारताचा व्यापार ह्या भागात केंद्रित करायचा असे गुजरात सरकारचे नियोजन झालेले आहे. हे महाराष्ट्रासाठी पथदर्शी व अनुकरणीय आहे.

पाच प्रकल्पांचे अहवाल तयार
गेल्या दहा वर्षापासून छगन भुजबळ, दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ साहेब, माजी आमदार जयंत जाधव,  जलचिंतन संस्था यांच्या सामुहिक पाठपुराव्यामुळे पाच नदीजोड प्रकल्पांचे अहवाल तयार झालेले आहेत. त्यामध्ये नार-पार गिरणा लिंक-१२.५ टीएमसी, पार-कादवा लिंक- ३.५ टीएमसी, दमणगंगा-एकदरे लिंक-५ टीएमसी, गारगाई-वैतरणा-कळवा-देवलिंक-०७ टीएमसी, दमणगंगा-पिंजाळ लिंक-३१ टीएमसी, वैतरणा-गोदावरी लिंक-११ टीएमसी असे एकूण ७० टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी निधी आवश्यक असून त्यादृष्टीने सामुहिक प्रयत्न आवश्यक आहे.

यावेळी अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रस्तावित केले. एन. एम.भामरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष बापूसाहेब घाटकर, राजेंद्र जाधव यांनी विविध सूचना केल्या. 

...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com