फडणवीसांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; शिवसैनिकांनी अडविला ताफा

हे दौरे केवळ फोटोसेशनसाठी करतात.
Farmer's suicide attempt during Devendra Fadnavis' visit to Muktainagar
Farmer's suicide attempt during Devendra Fadnavis' visit to Muktainagar

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उचंदा परिसरात शेतीची पाहणी करत असताना तालुक्यातील मेळसांगवे गावातील शेतकऱ्याने ताफा अडवत माझ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी का येत नाही? असा जाब विचारत विष घेण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगरातून जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडवून पीक विमा योजनेतील बदललेल्या निकषांबाबत निवेदन दिले. (Farmer's suicide attempt during Devendra Fadnavis' visit to Muktainagar)

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. १ जून) मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील वादळाने नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. त्यावेळी वरील प्रकार घडला. उचंदा शिवारात केळीबागांची पाहणी करत असताना मेळसांगवे येथील शेतकरी योगेश पाटील यांनी फडणवीसांचे वाहन अडविले. ‘माझ्या दोन हजार केळीच्या झाडांचे संपूर्ण नुकसान झाले असून माझ्या शेतापर्यंत चला’ अशी विनंती फडणवीसांना केली. मात्र, वाहने न थांबल्याने योगेश पाटील संतप्त झाले. राजकीय नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त करत हे दौरे केवळ फोटोसेशनसाठी करतात. यातून सरकारचा पैसा वाया जातो. मागील सरकारच्या काळातही अनेक दौरे झाले. मात्र, आमच्या पदरात काही पडले नाही, असे सांगत विष घेण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांनी अडवला ताफा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे खासदार रक्षा खडसे यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात गेले. तेथून ते खामखेडा गावाकडे प्रयाण करत असताना मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात शिवसैनिकांनी फडणवीस यांचा ताफा अडवत केंद्र सरकारने केळी पीक विमा निकष आधीप्रमाणेच करावे, अशी मागणी केली. या प्रसंगी ॲड. मनोहर खैरनार, प्रफुल पाटील, गणेश टोंगे, संतोष माळी आदी उपस्थित होते.
 
भाजप पदाधिकाऱ्यांची दांडी 

मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली. मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा साळुंके, जिल्हा परिषद सदस्या वैशाली तायडे, नीलेश पाटील, मुक्ताईनगरचे नगराध्यक्षा नजमा तडवी आणि ललित महाजन वगळता एकही नगरसेवक देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याप्रसंगी उपस्थित नव्हते.
 

रक्षा खडसेंच्या घरी घेतले चहापान

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून खडसे व फडणवीस यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. फडणवीसांवर आरोप करतच खडसेंनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर फडणवीसांचा हा पहिलाच दौरा होता. फडणवीस सकाळी खासदार रक्षा खडसेंच्या भेटीसाठी त्यांच्या कोथळीतील निवासस्थानी गेले. त्याठिकाणी चहापानही झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com