निळवंड्याचे पाणी आणणार : बाळासाहेब थोरात - Will bring Nilwanda water: Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

निळवंड्याचे पाणी आणणार : बाळासाहेब थोरात

आनंद गायकवाड
रविवार, 16 मे 2021

आगामी 2022 च्या पावसाळ्यातील निळवंडे धरणाचे पाणी कार्यक्षेत्रातल्या गावांमध्ये कालव्यांद्वारे आणणार आहे.

संगमनेर : आयुष्यातील ध्यास असलेल्या निळवंडे (Nilvande) कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मागील दीड वर्षात दोनदा लॉकडाऊनमुळे मजुर स्थलांतरित झाल्याने कामात अडथळे येत आहेत. (Will bring Nilwanda water: Balasaheb Thorat)

तरीही आगामी 2022 च्या पावसाळ्यातील निळवंडे धरणाचे पाणी कार्यक्षेत्रातल्या गावांमध्ये कालव्यांद्वारे आणणार असल्याचे सांगतानाच शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविणे गरजेचे असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

उच्चांकी गाळपासह या वर्षीच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ऑनलाईन पध्दतीने ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

थोरात म्हणाले, सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सहकारी संस्था ग्रामीण विकासाला मजबुती देत आहेत. कारखान्याने यावर्षी केवळ 192 दिवसात 13 लाख 19 हजार मेट्रीक टनाचे विक्रमी गाळप केले आहे. वेळेत व योग्य भावाचे वैशिष्ट्य जपल्याने कार्यक्षेत्रासह बाहेरच्या ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास कमावला आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबकसह आधुनिक प्रणालीचा वापर करावा लागेल. कार्यक्षेत्रातील ऊस वाढल्यास बाहेरील ऊस आणण्यासाठी होणाऱ्या वाहतूक व इतर खर्चाला आळा बसून, जास्त भाव देता येईल. 

सर्व सहकारी संस्था गुणवत्तेने चालविताना सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे हाच आपला ध्यास आहे. राजहंस दुध संघाने लॉकडाऊनच्या काळात एक दिवस ही संघ बंद ठेवला नाही. शाश्‍वत भाव दिला तरीही काही उत्पादक एक रुपयासाठी इतरत्र दुध घालतात याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. 

हेही वाचा..

मोकाट फिरणाऱ्यांची अॅंटिजन टेस्ट

बाजीराव खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, दुर्गा तांबे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष ऍड. माधव कानवडे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मण कुटे, इंद्रजित थोरात, गणपत सांगळे, अमित पंडित, उपाध्यक्ष संतोष हासे, शंकर खेमनर, शिवाजी थोरात, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, रामदास वाघ, रामहरी कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी मानले. 

दिवंगत सातव यांना श्रद्धांजली 

कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, बाळासाहेब थोरात व संगमनेर परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले युवा खासदार दिवंगत राजीव सातव यांना अमृत उद्योग समूह व साखर कारखान्याच्यावतीने सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख