नगरमध्ये मोकाट फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट - Antigen test of Mokat wanderers in the city | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये मोकाट फिरणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील "कडक लॉकडाउन' थोडे शिथिल केले.

नगर : महापालिका (Nagar Mahapalika) व तोफखाना पोलिसांनी शहरात मोकाट फिरणाऱ्यांची दिल्ली गेटसमोर अँटिजेन चाचणी केली. त्यामुळे त्यांची चांगलीच पाचावर धारण बसली होती. तोफखाना पोलिसांनी दिल्ली गेटसमोर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. (Antigen test of Mokat wanderers in the city)

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील "कडक लॉकडाउन' थोडे शिथिल केले. त्यामुळे आज (ता. 15) सकाळी बाजारपेठेत भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सोशल डिस्टन्सच्या नियमाचा सर्वांनाच विसर पडला होता. 

शहरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असल्याने आयुक्त गोरे यांनी महापालिका हद्दीत "कडक लॉकडाउन' लागू केले होते. नागरिकांचाही त्यास प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या दक्षता पथकाने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. त्याचा परिणाम शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटण्यात झाला. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त गोरे यांनी "लॉकडाउन' थोडे शिथिल केले. आजपासून शहरातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली झाली.

चौकांत भाजीविक्रेते दिसू लागले. फेरीवाले भाजीपाल्याच्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला लावून विक्री करताना दिसून आले. किराणा, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी रस्त्यावर व दुकानांसमोर गर्दी केली होती. भूषणनगर चौक, चाणक्‍य चौक, वाडिया पार्क, आयुर्वेद कॉलेज कोपरा, मार्केट यार्ड चौक, चितळे रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक, एकवीरा चौक, पाइपलाइन, गुलमोहर रस्ता आदी भागांत नागरिक रस्त्यावर दिसून आले. 

हेही वाचा...

जामखेडला होणार आॅक्जिन प्रकल्प

महापालिकेच्या दक्षता पथकाने काही भाजीविक्रेत्यांवर कारवाईही केली. पथक पाहताच फेरीवाले हातगाड्या पुढे नेत असल्याचा बहाणा करत होते. फळांची विक्रीसाठी काहींनी छोट्या टेम्पोंचा वापर केला. महापालिकेचे पथक दिसताच वाहन तेथून बाजूला न्यायचे व पथक गेले की पुन्हा रस्त्यावर फळांची विक्री करायची, असा प्रकार सुरू होता. 

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीबाजार सुरू करण्यास महापालिका आयुक्तांनी एक जूनपर्यंत निर्बंध घातले आहेत. या संदर्भातील आदेश आयुक्त गोरे यांनी आज काढला. त्यामुळे मार्केट यार्डमधील भाजीबाजार बंदच होता. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख