किती हा क्रुरपणा ! सांभाळण्याच्या कारणावरून दोन भावांनी केला वडिलांचा खून - What cruelty! Two brothers murdered their father for the sake of taking care | Politics Marathi News - Sarkarnama

किती हा क्रुरपणा ! सांभाळण्याच्या कारणावरून दोन भावांनी केला वडिलांचा खून

आनंद गायकवाड
गुरुवार, 20 मे 2021

चिंचोली गुरव येथील घरी असलेले वडील दशरथ माळी यांचा सांभाळ करायचा कोणी, यावरून रामदास व अमोल यांच्यात शनिवारी वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन, त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.

संगमनेर : वृद्ध वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून सख्ख्या भावांत वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यात वादाचे कारण कायमचे संपविण्यासाठी दोघांनी बापाचाच खून केला. ही घटना संगमनेर तालुक्‍यातील चिखली (Chikhali) येथे शनिवारी (ता. 15) रात्री घडली. दशरथ सुखदेव माळी (वय 60), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (What cruelty! Two brothers murdered their father for the sake of taking care) 

तालुक्‍यातील चिंचोली गुरव येथील आदिवासी समाजातील रामदास व अमोल माळी भावंडे रोजगारासाठी चिखली येथे आले. येथील वीटभट्टीवर मोलमजुरीचे काम करू लागले. चिंचोली गुरव येथील घरी असलेले वडील दशरथ माळी यांचा सांभाळ करायचा कोणी, यावरून रामदास व अमोल यांच्यात शनिवारी वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन, त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यामुळे वडील दशरथ माळी मध्यस्थीचा प्रयत्न करू लागले. मात्र, रागाच्या भरात वादाचे मूळ संपविण्यासाठी मुलांनी त्यांच्या डोक्‍यावर टणक वस्तूने प्रहार केला व गळा दाबून त्यांचा खून केला. 

याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रामदास दशरथ माळी (वय 25) व अमोल दशरथ माळी (वय 18) या दोघांना खुनाच्या संशयावरून अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आज (ता. 19) पोलिस हवालदार बन्सी टोपले यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

उत्तरीय तापासणीवरून मिळाली कलाटणी 

मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालावरून या प्रकरणाला कलाटणी मिळाली. डॉक्‍टरांनी मृत्यूचे कारण डोक्‍यावर टणक वस्तूने मारहाण करून, तसेच गळा दाबल्याने श्‍वास कोंडून मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा..

जखणगाव खंडणीतील तिघांना पोलिस कोठडी 

नगर : अश्‍लील चित्रफितीच्या आधारे खंडणी मागणाऱ्या जखणगावातील "त्या' महिलेसह दोन साथीदारांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वर्ग-एक दर्जाच्या एका अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून या महिलेविरुद्ध खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. 

एका व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून या महिलेच्या विरोधात अश्‍लील चित्रफीत तयार करणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात तिचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. तिच्या जाळ्यात वर्ग एकचा एक अधिकारीही अडकला होता. या व्यक्‍तीने नगर तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 18) फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सचिन खेसे (रा. हमीदपूर, ता. नगर) याला अटक केली. 

संबंधित महिला, तिचा साथीदार अमोल मोरे आणि सचिन खेसे या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या गुन्ह्यातील फरारी आरोपींना अटक करणे, पीडित व्यक्‍तीकडून लुटण्यात आलेली रक्कम हस्तगत करणे, तसेच सखोल तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून तिन्ही आरोपींना येत्या शनिवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

 

हेही वाचा..

राजकीय पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवावा

 

 

 

 

 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख