नगरचा आज स्थापनादिन ! कैरो, बगदादशी तुलना झालेल्या नगरला समृद्ध इतिहास - Today is the founding day of the city! Cairo, a city with a rich history compared to Baghdad | Politics Marathi News - Sarkarnama

नगरचा आज स्थापनादिन ! कैरो, बगदादशी तुलना झालेल्या नगरला समृद्ध इतिहास

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 28 मे 2021

पंधराव्या शतकाच्या शेवटी इसवीसन 1486मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यामधून फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी या निजामशहाने 28 मे 1490 रोजी सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरवात केली.

नगर : शहराचा (Ahmednagar) आज (ता. 28) स्थापना दिन आहे. शहर आता 531 वर्षांचे झाले. एके काळी बगदाद, कैरो या समृद्ध शहरांशी तुलना होत असलेले शहर विविध कारणांनी मोठे खेडेच राहिले. या शहराचा इतिहास मात्र समृद्ध आहे. (Today is the founding day of the city! Cairo, a city with a rich history compared to Baghdad)

पंधराव्या शतकाच्या शेवटी इसवीसन 1486मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यामधून फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी या निजामशहाने 28 मे 1490 रोजी सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरवात केली. हाच दिवस नगरचा स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. त्याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. त्यानंतर चारच वर्षांत शहराची पूर्ण स्थापना होऊन अहमदनगर निजामशाहीची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी होत होती. 
भुईकोट किल्ला हे शहराचे वैशिष्ट्य. 1490मध्ये बांधलेला हा किल्ला नगरचे वैभव ठरला आहे. याच किल्ल्यात 1942च्या "चले जाव' चळवळीत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अन्य नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. 

या शहरातील विविध वास्तू आजही सुस्थितीत आहेत. चांदबीबी महाल (सलाबतखान दुसरा याची कबर) ही इमारत 1580 मध्ये बांधण्यात आली. या ठिकाणी सलाबतखानासह त्याच्या दोन पत्नी आणि मुलांचीही कबर आहे. दमडी मशीद 1567 मध्ये साहीरखान याने बांधली. कोटलाबारा इमाम हे ठिकाण 1536 मध्ये बुऱ्हाण निजामशहा यांनी स्थापन केले. बाग रौझा ही काळ्या दगडांनी बांधलेली सुंदर इमारत आहे. अहमद निजामशहाचे ते निवासस्थान होते. फराहबाग पॅलेस ही सुंदर वास्तू 1508 च्या दरम्यान निजामशहाचा मुलगा बुऱ्हाणशहाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आली. औरंगजेबाची कबर 1707 मध्ये भिंगारजवळ बांधण्यात आली. तेथे औरंगजेबाला दफन करण्यात आले आहे. लष्कराचे मुख्यालय, सेंट जॉन कॅथलिक चर्च, आनंद धाम, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, कॅव्हलरी टॅंक संग्रहालय, मेहेरबाबांची समाधी, अशी काही स्थाने नगरची ओळख दर्शवितात. 

शहर कात का टाकेना? 

ऐतिहासिक शहर म्हणून नगरचे नाव राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात घेतले जाते. जिल्ह्यातील साईबाबांची शिर्डी जगप्रसिद्ध झाले. त्यासोबतच नगरचा इतिहास आजही जागतिक पातळीवर चाळला जात आहे. शहर स्थापन झाले त्या वेळी जागतिक पातळीवरील बगदाद, कैरो या शहरांशी तुलना होत होती; मात्र या शहरांचा विकास, वैभव पाहता नगर शहर का मागे राहिले? मोठा ऐतिहासिक वारसा असतानाही शहराने कात का नाही टाकली, या प्रश्नांची उत्तरे नगरकरांना ज्ञात आहेतच; त्याचे फक्त अनुकरण करणे बाकी आहे. 

 

हेही वाचा...

मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विखे पाटलांची तयारी

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख