संगमनेरात जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांवर दगडफेक - In Sangamnera, the mob attacked the police and hurled stones at the vehicles | Politics Marathi News - Sarkarnama

संगमनेरात जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांवर दगडफेक

आनंद गायकवाड
शुक्रवार, 7 मे 2021

याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्यासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर : शहरातील तीन बत्ती परिसरात गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी सव्वासहा ते सातच्या सुमारास गर्दी झाली होती. पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी गर्दी करणाऱ्यांना कोरोना (Covid - 19) प्रतिबंधक नियमांची जाणीव करून दिली. त्याचा राग आल्याने जमावातील काहींनी पोलिसांवर हल्ला केला. (In Sangamnera, the mob attacked the police and hurled stones at the vehicles)

याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्यासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शहरातील लखमीपुरा परिसरात गर्दी जमा झाली होती. यावेळी राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी मास्क, सामाजिक अंतर या नियमांची पायमल्ली करणाऱ्या जमावाला कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकत नसल्याने त्यांनी त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही हुल्लडबाजांनी थेट पोलिसांनाच टार्गेट करून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच, यावेळी काहींनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोगलपुरा परिसरातील बॅरिकेड, तसेच तीन बत्ती चौकात पोलिसांना सावलीसाठी उभारलेल्या राहुटीचे नुकसान केले.

पोलिसांच्या वाहनांसह या परिसरातील काही खासगी वाहनांवर दगडफेक करून नुकसान करीत दहशत निर्माण केली. जमाव संतप्त झाल्यामुळे पोलिसांनी शहराच्या दिशेने निघून जाणे पसंत केले. 

या घटनेत पोलिस मुख्यालयातील कान्स्टेबल सलमान मुख्तार शेख, प्रशांत प्रभाकर केदार व भगीरथ शंकर देशमाने जखमी झाले आहेत. यावेळी तीन बत्ती चौकात सुमारे शंभर ते दीडशे जणांचा जमाव जमला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख आदींनी भेट देत शांततेचे आवाहन केले. 

हेही वाचा...

कोपरगावात पोलिस बंदोबस्तात लसीकरण

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, निसार खिचडीवाला, जाकिर खान, मोहंमद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या निष्पन्न आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले. 

या घटनेचे मोबाईलवर केलेले चित्रीकरण रात्री समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने, सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, कायदा- सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची गय करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख