अश्‍लील चित्रफीतीद्वारे मागितली एक कोटीची खंडणी, महिलेसह साथीदारास अटक - One crore ransom demanded through pornographic videos, woman and her accomplice arrested | Politics Marathi News - Sarkarnama

अश्‍लील चित्रफीतीद्वारे मागितली एक कोटीची खंडणी, महिलेसह साथीदारास अटक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

एका व्यक्‍तीला जखणगाव (ता. नगर) येथे 26 एप्रिल 2021 रोजी बोलाविण्यात आले होते. या महिलेने एका साथीदाराच्या मदतीने या व्यक्‍तीची अश्‍लील चित्रफीत तयार केली.

नगर : अश्‍लील चित्रफीत तयार करून त्याआधारे एक कोटी (One Coror) रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. नगर तालुक्‍यातील जखणगावमध्ये ही घटना घडली. या महिलेकडून रोख 69 हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या, तसेच तिच्या साथीदाराकडून 15 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (One crore ransom demanded through pornographic videos, woman and her accomplice arrested)

एका व्यक्‍तीला जखणगाव (ता. नगर) येथे 26 एप्रिल 2021 रोजी बोलाविण्यात आले होते. या महिलेने एका साथीदाराच्या मदतीने या व्यक्‍तीची अश्‍लील चित्रफीत तयार केली. त्याला चाकूचा धाक दाखवून दोरीने बांधले, तसेच त्याच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीची पाच तोळे वजनाची चेन, हातातील सहा तोळे वजनाच्या चार अंगठ्या व रोख 84 हजार 300 रुपये, असा पाच लाख 44 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटला. या महिलेने एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी या व्यक्‍तीकडे केली. ही रक्कम न दिल्यास चित्रफीत पोलिसांना देऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली. 

हेही वाचा...

जामखेडला आॅक्सिजन प्रकल्प होणार

या व्यक्‍तीने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. नगर तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आर. एन. राऊत यांच्या पथकाने तपास सुरू केला, तसेच या महिलेचा साथीदार अमोल मोरे (वय 30, रा. नगर) याला ताब्यात घेतले. त्याने संबंधित महिला ही जखणगावात राहत असल्याची माहिती दिली. या महिलेला तेथून अटक करण्यात आली. तिच्या ताब्यातून सोन्याच्या अंगठ्या, रोख 69 हजार 300 रुपये हस्तगत करण्यात आले. तिच्या साथीदाराकडून 15 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. 

दरम्यान, या प्रकरणामुळे महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली असून, यामागे रॅकेट आहे का, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख