नगरमध्ये महापौरपदासाठी राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र? - NCP, Shiv Sena together for the post of mayor in the city? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नगरमध्ये महापौरपदासाठी राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 जून 2021

नगर महापालिका येथील आगामी महापौरपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी शिवसेनेकडे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत.

नगर : नगर महापालिकेतील महापौर बाबासाहेब वाकळे (Babasaheb Wakle) यांचा कार्यकाळ ३० जूनला संपणार आहे. त्यामुळे महापौरनिवडीच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाली. या भेटीत नगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता हाती घेण्याचे ठरले असल्याचे सूत्रांकडून समजते. (NCP, Shiv Sena together for the post of mayor in the city?)

नगर महापालिका येथील आगामी महापौरपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी शिवसेनेकडे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. नगर शहरात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. शहरात शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौरपद मिळवून दिले होते. तसेच सभागृहनेते पदही भाजपलाच देण्यात आली होते. मात्र त्यानंतर राज्यातील समीकरणे आता बदलली आहेत राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आहे हेच समीकरण नगर महापालिकेतही राबविण्याच्या हालचाली सध्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी चालवले आहेत. शिवसेनेकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत आज झालेली पवार व शिंदे यांची बैठक नगर शहरातील राजकारण बदलणारी ठरेल, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

३० तारखेला महापौरपद निवडणूक

महापालिकेतील महापौर निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी आज जाहीर केला. त्यानुसार ३० जूनला सकाळी ११ वाजता निवडणूक होईल. यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या सहली निघणार आहेत.

 

हेही वाचा..

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

नगर : राज्यातील महाआघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर शनिवारी (ता.२६) जिल्ह्यात चौदा ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नगरला बैठक झाली. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी आंदोलनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे आदी उपस्थित होते.

महाआघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत ही प्रभावी भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडता आली नाही. मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्‍न सोडविता आला नाही. राज्य सरकार सर्व बाबीत अपयशस्वी झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात २६ जूनला सकाळी अकरा वाजता एक हजार ठिकाणी चक्‍का जाम आंदोलन केले जाणार आहे. नगर जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यात हे आंदोलन केले जाणार आहे.

अजित पवारांची भेट ही व्यक्‍तीगत

राम शिंदे म्हणाले की, मुलीचा विवाह २० जूनला झाला. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिले. अजित पवारांना हे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

हेही वाचा..

माझी झोप उडालीय, मंत्र्यांनाही झोपू देणार नाही

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख