नगर अर्बन बॅंक सोनेतारण गैरव्यवहार ! शेवगावच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

मयत शिंदे यांच्या खिशात सापडलेल्या हस्तलिखीत चिठ्ठीमध्ये बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण व्यवहारातील फसवणुकीत माझा काहीही संबंध नाही.
Crime.jpg
Crime.jpg

शेवगाव : बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सुर्यभान शिंदे ( वय-59) यांनी भातकुडगाव येथील स्वत:च्या शेतामध्ये विषारी औषध घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. 27) दुपारी घडली. पोलीसांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Nagar Urban Bank Goldsmith Misconduct! Suicide of Shevgaon branch manager)

भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील गोरक्षनाथ सुर्यभान शिंदे हे नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते सोमवारी बँकेच्या कामासाठी नगर येथे गेले होते. मंगळवारी ते शेवगाव येथील शाखेत न जाता घरीच थांबले होते. काल दुपारी 3 च्या सुमारास ते भातकुडगाव येथील त्यांच्याच शेतात बेशुध्द अवस्थेत पडलेले कुटूंबियांस आढळून आले. त्यानंतर त्यांना शेवगाव येथील ग्रामिण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डाँक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत त्यांचे चुलत भाऊ कचरु तुकाराम शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस काँ. बाबासाहेब शेळके हे करीत आहेत.

दरम्यान, मयत शिंदे यांच्या खिशात सापडलेल्या हस्तलिखीत चिठ्ठीमध्ये बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारण व्यवहारातील फसवणुकीत माझा काहीही संबंध नाही. बँकेने शाखेत नेमलेला गोल्ड व्हँल्युअर सोन्याचे परिक्षण व मुल्यांकन करुन दाखला देतो. त्यावर विश्वास ठेवून कर्जदारांना सोनेतारण मंजूर केले जाते. सदर कर्जासाठी देण्यात आलेले सोने खातेदार, गोल्ड व्हँल्यूअर व शाखाधिकारी यांच्या समक्ष सिलबंद करुन त्यावर खातेदाराची व गोल्ड व्हँल्यूअरची सही घेवून ती सिलबंद पिशवी शाखाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली जाते.

या सर्व व्यवहारास गोल्ड व्हँल्युअर जबाबदार असतो. कारण त्याने सदरचे दागीने परिक्षण व मुल्यांकन केलेली असतात. त्यामुळे यात माझा काहीही दोष नाही. बँकेची गोल्ड व्हँल्युअर व खातेदार यांनी फसवणूक केलेली आहे. माझा यात काहीही दोष नाही. माझी फसवणूक झालेली असून, कृपया मला माफ करावे. अशा आशयाचा मजकुर आढळून आला आहे.

या घटनेमुळे नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण गैरव्यवहारास वेगळे वळण लागले असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. मात्र मितभाषी व मनमिळावू स्वभावाच्या शिंदे यांचा या प्रकरणात हकनाक बळी गेल्यामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले, एक विवाहीत मुलगी असा परीवार आहे.
 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com