खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास धक्काबुक्की - MP Lokhande's bodyguard pushed | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास धक्काबुक्की

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

कठीण काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई खेमानंद मेडिकल संस्थेतील दोन रुग्णवाहिका परिसरातील रुग्णांना उपलब्ध करून देण्याची मागणी उदय लिप्टे यांनी केली होती.

श्रीरामपूर : खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या बंगल्यात घुसून सुरक्षारक्षकासह अंगरक्षकास शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी अंगरक्षक पोलिस कर्मचारी विनोद उंडे यांच्या फिर्यादीवरून बेलापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (MP Lokhande's bodyguard pushed) 

खासदार लोखंडे यांच्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) येथील साई खेमानंद फाउंडेशन ट्रस्टच्या कार्यालयात उदय लिप्टे (रा. पढेगाव) याच्यासह पाच जण काल (ता. 12) रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आले. त्यांनी लाथा मारून कार्यालयाचे दार उघडल्याने सुरक्षारक्षक नीलेश शिंदे यांनी त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने लिप्टे व त्याच्या साथीदारांनी शिंदे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत कार्यालयातील चारचाकी वाहनावरील कापड फाडून त्याचे चित्रीकरण केले. 

त्यानंतर लिप्टे यांनी खासदार लोखंडे यांच्या निवासस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यास लोखंडे यांचे अंगरक्षक पोलिस शिपाई विनोद उंडे यांनी मज्जाव केला. या पाच जणांनी उंडे यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिप्टे व अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णा धायवट तपास करीत आहेत. 

आकसातून गुन्हा दाखल 

दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळत नाहीत. अशा कठीण काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई खेमानंद मेडिकल संस्थेतील दोन रुग्णवाहिका परिसरातील रुग्णांना उपलब्ध करून देण्याची मागणी उदय लिप्टे यांनी केली होती. त्याचा राग धरून राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे. 
 

हेही वाचा...

कोविडविरुद्ध "आयएमए'चा लढा सुरू : डॉ. देव 

श्रीरामपूर : "कोरोना संकटात इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राज्यातील 45 हजार डॉक्‍टर जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. वर्षभरापासून डॉक्‍टर मंडळी कुटुंबातील सर्वांपासून वेगळी राहून कोविडचे आव्हान पेलत आहेत,' असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे येथील अध्यक्ष डॉ. भूषण देव, उपाध्यक्ष डॉ. संजय शेळके, सचिव डॉ. सुनील गोराणे, खजिनदार समीर बडाख यांनी सांगितले. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या येथील शाखेने नुकतेच एक प्रसिद्धिपत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे, की कोरोनाच्या संकटात महत्त्वपूर्ण गोष्टी सर्वांना माहीत असणे आवश्‍यक आहे. लोकांनी न घाबरता काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय

आपल्याला कुठलेही लक्षण आढळल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोनाची तपासणी वेळेत आणि लवकर करावी. आजार अंगावर काढू नये. ऐकीव माहितीच्या आधाराने स्वतःवर परस्पर उपचार करू नयेत. कुठल्याही शंका असल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. डॉक्‍टरांनी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितल्यास दाखल व्हावे. नियमित मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे, स्वच्छता राखणे, अशा गोष्टींचे पालन करावे. डॉक्‍टर रुग्णांना उपचार देण्याचा वसा कधीही सोडणार नाहीत, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

 

 

Edited By  - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख