आमदार लंकेंचे षटकार इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारे, पुढील निवडणुकीचे चित्र कसे - MLA Lankan's sixes in the eyes of others, how the picture of the next election | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंकेंचे षटकार इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारे, पुढील निवडणुकीचे चित्र कसे

मुरलीधर कराळे
सोमवार, 21 जून 2021

आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी (ता. पारनेर) येथे शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर सुरू झाले. राज्यात सर्वात चांगले कोविड सेंटर म्हणून त्याची वाहवा झाली.

नगर : कोरोनाच्या (Corona) काळात एका आमदाराने थेट दिल्ली गाजविली. महाराष्ट्राबरोबरच हरियानासारख्या राज्यातून काही नेते, कार्यकर्ते थेट कोविड सेंटरचे मॅनेजमेंट पाहण्यासाठी या आमदाराच्या मतदारसंघात धडकले. पडत्या काळात काही नेते घरात बसले असताना हे आमदार कधी घरात गेलेच नाहीत. आता कोरोना ओसरताच त्यांनी निधी आणून कामांचा धडाका धरला आहे. होय, पारनेरचे आमदार नीलेश (Nilesh Lanke) लंकेंचे षटकार इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरत आहे. (MLA Lankan's sixes in the eyes of others, how the picture of the next election)

आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी (ता. पारनेर) येथे शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर सुरू झाले. राज्यात सर्वात चांगले कोविड सेंटर म्हणून त्याची वाहवा झाली. लंके यांनीही स्वतःला कोरोना रुग्णांच्या सेवेत झोकून दिले. स्वतः घरी न जाता कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला. कोरोना रुग्णांना दिलासा दिला. कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मनोरंजन केले. त्यांना मानसिक धैर्य दिले. त्यामुळेच इतर राज्यातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी या सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्याप्रमाणे आपापल्या मतदारसंघात सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून आमदार लंके यांना कोरोना रुग्णांनी झपाटले आहे. आणि आमदार लंके यांचे काम पाहून इतर आमदारांना लंकेंनी झपाटले, अशी स्थिती गेल्या काही महिन्यांपासून झाली. कोरोना ओसरताच लंके यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. इतर आमदार बाहेर पडू लागले असताना लंके यांनी मात्र मुंबईतील चकरा वाढविल्या आणि मोठा निधी आणण्यात यश मिळविले.

राज्यात कोरोनामुळे विकासनिधीला मोठी कात्री लागली. मात्र त्या कात्रीतून लंके यांनी मतदारसंघासाठी तब्बल पाच कोटींचा निधी मिळविला. जिल्ह्यात हा निधी अव्वल ठरला आहे. राज्यसेवा, केंद्रातील विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी निघोज येेथे तब्बल एक कोटी रुपये खर्च करून अभ्यासिका मंजूर करून आणली. याबरोबरच मतदारसंघातील रस्ते चकाचक करण्यासाठी मोठा निधी वापरला जाणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या देवस्थानांचा विकास खुंटल्याने तिकडे लक्ष देत विविध मंदिरांसाठी मोठा निधी देण्याचे नियोजन केले आहे.

कोणाच्या डोळ्यात खुपतो लंकेंचा विकास

लंके यांचे काम पाहून जिल्ह्यातील इतर आमदारांवर मात्र जनतेने आणि माध्यमांनीही ताशेरे ओढले आहेत. कोरोनाच्या काळात काही आमदार घरात बसून राहिले, असा आरोप कार्यकर्त्यांकडून, जनतेकडून झाला. त्यामुळे इतर काही आमदारांच्या दृष्टीने हे काम डोळ्यात खूपणारे ठरले आहे. जिल्ह्यातील काही आमदारांनीही कोरोना काळात अत्यंत चांगले काम करून जनतेची सेवा केली, हेही तितकेच खरे.

विरोधकांचा सध्या तरी फडशा

पारनेर तालुक्यात आमदार लंके यांनी या काळात विरोधकांचा फडशाच पाडला, अशी स्थिती झाली आहे. काही नेते आगामी विधानसभेच्या तयारीला लागले असताना लंके यांची तयारी आपोआप झाल्याचे दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातील जनता सध्या तरी आमदार लंके यांचाच उदोउदो करीत आहे. विरोधकांचा सध्या त्यांनी फडशा पाडला असला, तरी ऐनवेळी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे काळच ठरविणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लंके यांना मोठे विरोधक आहेत. त्यांना संबंधित पक्षाकडून राजकीय बळही मिळत आहे. निवडणुकीच्या वेळी पत्ते कसे उघडले जातात, यावरच आगामी लढत अवलंबून राहणार आहे.

 

उमेदवारीतही काही काटे

लंके यांचे काम पाहून राष्ट्रवादीकडून लंके यांनाच आगामी उमेदवारी मिळेल, असे वाटत असले, तरी त्यांच्या वाटेतही काही काटे आहेत. राष्ट्रवादीचे पारनेर तालुक्यातील इतरही नेते मोठे होत आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार द्यायची, याची तयारी आताच सुरू झाल्याचे समजते. 

 

हेही वाचा..

साईसंस्थानवर स्थानिकांनाच प्राधान्य हवे

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख