मंत्री गडाख यांच्या प्रयत्नांना यश; नेवाश्यात साकारतोय ऑक्‍सिजन प्रकल्प  - Minister Gadakh's efforts succeed; Oxygen project in Nevasa | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नांना यश; नेवाश्यात साकारतोय ऑक्‍सिजन प्रकल्प 

सुनिल गर्जे
सोमवार, 10 मे 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्‍यात ऑक्‍सिजनचा प्रश्‍न ऐरणीवर आला. या आठवड्यात जिल्ह्यातील ऑक्‍सिजन पुरवठा काहीसा सुरळीत झाला असला, तरी ऑक्‍सिजनसाठी प्रशासनाला मोठया प्रमाणावर धावपळ करावी लागली.

नेवासे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनचा प्रश्‍न गंभीर बनला होता. तालुका ऑक्‍सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने सुमारे दीड कोटी रुपयांचा ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प साकारत आहे. (Minister Gadakh's efforts succeed; Oxygen project in Nevasa)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्‍यात ऑक्‍सिजनचा प्रश्‍न ऐरणीवर आला. या आठवड्यात जिल्ह्यातील ऑक्‍सिजन पुरवठा काहीसा सुरळीत झाला असला, तरी ऑक्‍सिजनसाठी प्रशासनाला मोठया प्रमाणावर धावपळ करावी लागली. ही बाब लक्षात घेत गडाख यांनी मागील महिन्यात नेवासे तालुक्‍यातील चिलेखनवाडी येथील ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पाची अधिकाऱ्यांसह जाऊन पाहणी केली. तसेच तेथील विविध अडचणी सोडविल्या होत्या. अधिकाऱ्यांशी बैठक घेत नेवासे येथे ऑक्‍सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला आता यश आले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यावर तालुक्‍यातील आरोग्य विभागाला संजवनी मिळणार आहे.

हेही वाचा...

राम शिंदेंपुढे समस्यांचा पाढा 

नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेला ऑक्‍सिजन प्रकल्प हा तमिळनाडूमधील कोइंबतूरची फॅरेडे ओझोन ही कंपनी बनविणार असून, सुमारे दीड कोटीचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे दीडशे सिलिंडर ऑक्‍सिजन तयार होणार आहे. दरम्यान, कोरोना संकट काळात ऑक्‍सिजन पुरवठ्याचा प्रश्‍न गडाखांच्या प्रयत्नाने सुटल्याने तालुक्‍यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

भविष्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा नसेल 

तालुक्‍यात शनिशिंगणापूर भक्तनिवास येथे 250, तर भेंडे बुद्रुक येथे 300 बेडचे व खासगी दोन, असे चार कोविड केअर सेंटर आहेत. तसेच दोन शासकीय व दहा खासगी, असे 12 कोविड हेल्थ केअर सेंटर आहेत. नेवासे फाटा येथील ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यावर भविष्यात तालुक्‍याला ऑक्‍सिजनचा तुटवडा भासणार नाही. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख