महापौर शिवसेनेचाच होणार, तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला : दिलीप सातपुते

नगरचे महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. त्यासाठी शिवसेनेकडे तीन उमेदवार आहेत.
Shivsena.jpg
Shivsena.jpg

नगर : "महापालिकेने नाशिक विभागीय आयुक्‍तांना महापौरपद निवडणुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या (Shivsena) शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांनी महापौरपद निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली, तसेच शिवसेनेचाच महापौर करण्याचा शब्द दिला,'' अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. (The mayor will belong to Shiv Sena, said the Chief Minister: Dilip Satpute)

नगरचे महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. त्यासाठी शिवसेनेकडे तीन उमेदवार आहेत. यात गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने आज शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली. यात शहरातील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या, पक्षीय बलाबल, शहरातील राजकीय स्थिती आदींबाबत सविस्तर चर्चा केली. नगर महापालिकेत शिवसेनेकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीकडून महापौरपद मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेने यापूर्वी महाविकास आघाडीचा धर्म पाळत सलग दोन वेळा स्थायी समिती सभापतिपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी शिवसेनेच्या पदरात महापौरपद घालेल, अशी अपेक्षा वर्तवीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. 

हेही वाचा...

नगरची वेगळी ओळख असावी 

नगर : आपल्या या लाडक्‍या नगर शहराचा 531वा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. हे शहर एके काळी जगात आधुनिक शहर असल्याचे दाखले आहेत. दुर्दैवाने आजची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या शहरास कोणतीही मोठी आर्थिक मदत मिळण्याची शक्‍यता नाही. आहे याच परिस्थितीत आपण कसा विकास साधू, याचाच विचार झाला पाहिजे, असे मत युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानियाचे निवृत्त प्रोफेसर डाॅ. दत्ता पोंदे यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, की नगरच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्रात आणखी दोन गोष्टींची भर पडावी, असे वाटते. औद्योगिक चिकित्सा केंद्र व औद्योगिक रिसायकल केंद्र. वरील दोन्ही क्षेत्रांत तुलनेने कमी गुंतवणूक लागते. औद्योगिक वसाहत यासाठी योग्य ठरेल. वैद्यकीयदृष्ट्या पाहिले, तर जिल्हा शासकीय रुग्णालयाची नवी इमारत उभी राहत आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेतल्यास दिल्लीचे "मोहल्ला क्‍लिनिक' आदर्श बनू शकते, तर आपल्या नगरचे हे रुग्णालय का आदर्श बनू नये? 

नगर शहरातील सार्वजनिक उद्याने एखाद्या संस्थेला किंवा उद्योगाला चालविण्यासाठी द्यावीत. पुण्याजवळील मोठे उपनगर म्हणून विकास होऊ पाहत असलेल्या या शहरातच केंद्रीय विद्यापीठ व्हायला हवे. जिल्ह्यातील विविध पक्षांच्या राजकारण्यांनी एकत्र येऊन शहरविकासाबाबत चर्चा करायला हवी. 
नगरच्या स्थापनादिनानिमित्त प्रत्येक नगरकराने सायंकाळी घरापुढे रांगोळी काढून दिवे लावावेत. नगरच्या ऐतिहासिक वास्तूवरसुद्धा दिवे लावावेत. चौकाचौकांत सेल्फी पॉइंट असावेत. आपल्या शहराच्या काही समस्या आहेत व यापुढेही राहणार आहेत; मात्र "मी नगरकर' ही भावना जागृत होणे सर्वांत महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com