नगर महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय ! शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणार

महापालिकेत आज ऑनलाइन सर्वसाधारण सभा झाली. महापौर झाल्यानंतरची रोहिणी शेंडगे यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा.
Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

नगर : महापालिका हद्दीतील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, शहरातील मालमत्तांच्या तिप्पट करवाढीचा प्रस्ताव स्थगित झाला. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. हे पुनर्मूल्यांकन महापालिका कर्मचारी अथवा खासगी संस्थेकडून करण्याचा निर्णय महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला आहे. (Important decision of Municipal Corporation! There will be a revaluation of properties in the city)

महापालिकेत आज ऑनलाइन सर्वसाधारण सभा झाली. महापौर झाल्यानंतरची रोहिणी शेंडगे यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा. त्यांच्यासह उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक कुमार वाकळे, अनिल शिंदे, डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, रूपाली वारे, शीला चव्हाण, महापालिका आयुक्त शंकर गोरे, तसेच नगरसेवक व महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ७९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव आस्थापना विभागाच्या मान्यतेने सरकारला पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. महापालिकेच्या आस्थापना विभागावर या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा पडू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले. बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर आदींनी आरोग्य विभागाच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी याबाबत असमर्थता व्यक्त करीत, प्रशासकीय अडचणींचा पाढाच वाचून दाखविला.

शहरातील मालमत्तांचे जी.आय.एस. आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करण्याच्या २०१२ला देण्यात आलेल्या ठेक्याबाबत नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली. तरीही उपायुक्त यशवंत डांगे यांनी, खासगी संस्थेकडून मालमत्ता सर्वेक्षण करणे योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या अनिल शिंदे यांनी याला विरोध दर्शवीत, हे काम महापालिका कर्मचाऱ्यांकडूनच करावे, अशी मागणी केली. महापालिकेचे काही कर्मचारी घरबसल्या फुकटचा पगार घेत आहेत. त्यांना कामाला लावा. शहरातील नगररचना व वसुली विभागाचे कर्मचारी काय करीत आहेत, असा सवालच शिंदे यांनी उपस्थित केल्याने, अधिकाऱ्यांची कोंडी झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिंदे यांच्या भूमिकेला प्रतिसाद दिला.

महिला नगरसेवकांनी मांडले प्रश्‍न

या सभेत महापौरांनी नगरसेविकांना अधिकाधिक बोलण्याची संधी देण्यावर भर
दिला. नगरसेविकांनी प्रामुख्याने पाणी व मालमत्ता करवाढ या प्रश्‍नावर अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली.

हेही वाचा..

डिसेंबरपूर्वी शहरात महापुरुषांचे पुतळे

कुमार वाकळे यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांबाबत प्रश्‍न मांडला. यावर महापालिका आयुक्तांनी, पाच नगरसेवक व अधिकाऱ्यांची समिती स्थापन करा, चांगली माणसे द्या, मी डिसेंबरपूर्वी शहरात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचे पुतळे उभे करून देतो, असे सभागृहाला आश्‍वस्त करताच, नगरसेवकांनी समिती तयार करण्याच्या कामाला आज सुरवात केली.

पाणीप्रश्‍नी अधिकाऱ्यांची कोंडी

शहरातील अनेक भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी आयुक्त, उपायुक्त व पाणीपुरवठा विभागप्रमुखांची कोंडी केली. नागरिकांचे प्रश्‍नच सभेत पटलावर आल्याने अधिकारी निरुत्तर झाले. रस्त्यांचे चुकीचे आराखडे, जलवाहिन्या व ड्रेनेजलाइनचा चुकीचा उतार, याकडे नगरसेवकांनी अंगुलिनिर्देश केला.

दरम्यान, या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com