मी ‘मिस्टर क्लिन’च! भगवानराव पाचपुते - I'm Mr. Clean! Bhagwanrao Pachpute | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मी ‘मिस्टर क्लिन’च! भगवानराव पाचपुते

संजय आ. काटे
गुरुवार, 22 जुलै 2021

सहकार खात्याची जी नोटीस आली, त्यानुसार झालेली चौकशी अनियमित कर्जप्रकरणाची आहे; गैरप्रकार झाला म्हणून नाही.

श्रीगोंदे : ‘‘सहकारातील जाणत्या नेत्यांना जे ॲवॉर्ड घेता आले नाहीत, ते काष्टी सेवा संस्थेने स्वच्छ कारभारातून मिळविले. ज्यांना आपण अध्यक्ष केले, तेच आता संस्थेची बदनामी करीत आहेत. कर्जवितरणात झालेली अनियमितता म्हणजे भ्रष्टाचार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्यांनी, आपण संस्थेत एका रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध केले, तर पुन्हा संस्थेत पाऊल ठेवणार नाही,’’ असे आव्हान काष्टी सेवा संस्थेचे ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते यांनी विरोधकांना दिले. (I'm Mr. Clean! Bhagwanrao Pachpute)

काष्टी सेवा संस्थेच्या कारभारात गैरप्रकार सुरू असून, त्याबाबत शासनाने चौकशी समिती नेमल्याचे सांगत माजी अध्यक्ष कैलास पाचपुते, विठ्ठलराव काकडे, राकेश पाचपुते, प्रा. सुनील माने यांनी भगवानराव पाचपुते यांच्यावर आरोप केले होते.

भगवानराव पाचपुते म्हणाले, ‘‘सहकार खात्याची जी नोटीस आली, त्यानुसार झालेली चौकशी अनियमित कर्जप्रकरणाची आहे; गैरप्रकार झाला म्हणून नाही. आता दुसऱ्या चौकशांचा ‘फार्स’ सुरू झाला असून, तो राजकीय दबावातून आहे. चौकशीसाठी वरिष्ठ पातळीवरून निरोप येत असल्याचे समजते.’’

ज्या अधिकाऱ्यांनी कर्जवितरण व कर्जमाफी करण्यासाठी मंजुरी दिली, त्यांनीच चौकशी केली. काष्टी संस्थेची उलाढाल दोनशे कोटींवरून आता ४५ कोटींवर कशी आली, अशी विचारणा करणाऱ्यांना, ‘उलाढाल दोनशे कोटी कधी होती,’ असा प्रतिप्रश्‍न करीत भगवानराव पाचपुते म्हणाले, ‘‘कष्ट मी घेतले आणि ॲवॉर्ड मात्र आरोप करणारे घेऊन आले. त्यासाठी मनाचा मोठेपणा मी दाखविला. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या संस्थांना जे ॲवॉर्ड मिळाले नाहीत, ते काष्टी संस्थेने मिळविले. स्वच्छ कारभारामुळे हे शक्य झाले. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याने आपणही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.’’

दरम्यान, या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रभर सहकार क्षेत्रात होत आहे.

त्यांच्यावर कुठलाही आरोप करीत नाही

संस्थेतील खरा कारभार चौकशीत समोर आल्याने भगवानराव पाचपुते अस्वस्थ आहेत. आम्ही त्यांच्यावर कुठलाही आरोप करीत नाही. चौकशी अहवालात जे आहे, ते मांडतोय. तुमचा कारभार जर स्वच्छ होता, तर चौकशीत दोषी कसे आहात?
- कैलास पाचपुते, माजी अध्यक्ष, काष्टी सेवा संस्था

 

हेही वाचा..

कोपरगावमध्ये भाजपला धक्का

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख