श्रीपाद छिंदमविरुद्ध दोषारोपपत्रास गृह विभागाची मंजुरी - Home Department approves chargesheet against Shripad Chhindam | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीपाद छिंदमविरुद्ध दोषारोपपत्रास गृह विभागाची मंजुरी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

उपमहापौर छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले होते.

नगर : महापालिकेचा बडतर्फ उपमहापौर आरोपी श्रीपाद शंकर छिंदम (Shripad Chindam) याच्याविरुद्ध महापुरुषाचा अवमान करणे व समाजात तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यास राज्याच्या गृह विभागाने परवानगी दिली आहे. (Home Department approves chargesheet against Shripad Chhindam)

उपमहापौर छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले होते. बिडवे यांनी याबाबत कर्मचारी संघटनेकडे तक्रार केली होती. हे संभाषण समाजमाध्यमातून अल्पावधीत राज्यभर व्हायरल झाले होते.

छिंदमचा राज्यभर निषेध सुरू झाला होता. त्यानंतर त्याने नगर शहरातून पळ काढला. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी श्रीपाद छिंदम याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात ९७/ २०१८ भारतीय दंडविधान कलम २९५ (अ), २९८, १५३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नगरच्या पोलिसांना तो त्याच दिवशी शरण आला.

महापालिकेच्या उपमहापौर या महत्त्वाच्या पदावर तो कार्यरत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी फौजदारी न्यायप्रक्रिया संहितेच्या कलम १९६ अन्वये राज्य शासनाच्या परवानगीची गरज होती. जिल्हा पोलिस दलातर्फे गृह विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. गृह विभागाच्या उपसचिवांनी दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक के. व्ही. सुरसे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. तो पूर्ण झाला आहे. गृह विभागाने परवानगी दिल्याने सोमवारी (ता. १९) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाण्याची शक्‍यता आहे.

छिंदम बंधूंवर गंभीर गुन्हे

श्रीपाद व श्रीकांत छिंदम या दोन्ही बंधूंवर नगर शहरातील पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जमाव जमवून मारहाण करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आदींचा त्यांत समावेश आहे. श्रीपाद याच्यावर पाच, तर श्रीकांत याच्यावर चार गंभीर गुन्हे तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

 

हेही वाचा..

विखे-लंके वाकयुद्ध कशामुळे

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख