खासदार विखे पाटील - आमदार लंके यांच्यातील वाकयुद्धाला झालर कशाची? - MP Vikhe Patil - What will happen to the war of words between MLA Lanka? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

खासदार विखे पाटील - आमदार लंके यांच्यातील वाकयुद्धाला झालर कशाची?

मुरलीधर कराळे
शनिवार, 17 जुलै 2021

दोघेही एकमेकांचे स्पर्धक असण्याची शक्यता नाही. असे असताना कोणत्या कारणाने हे नेते आरोप करतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

नगर : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) व पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे वाकयुद्ध सुरू झाले आहे. प्रत्यक्षात दोन्ही मतदारसंघ वेगळे आहेत. दोघेही एकमेकांचे स्पर्धक असण्याची शक्यता नाही. असे असताना कोणत्या कारणाने हे नेते आरोप करतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (MP Vikhe Patil - What will happen to the war of words between MLA Lanka?)

विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात आमदार लंके यांचे नाव न घेता कोविड सेंटरच्या विषयावरून लंके यांना टोला लगावला होता. त्यावर लंके यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रेमडेसिव्हीर, आगावू रक्कम घेऊन रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करून घेणे अशा प्रकारचे आरोप खासदार विखे पाटील यांच्यावर केले. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

विखे पाटील यांची यापूर्वीही पारनेरशी कायम नाळ जोडलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, त्यांना पारनेर तालुक्यातून अनेक गावांत लीड मिळाले. याशिवाय अनेक कार्यक्रमांसाठी विखे पाटील आवर्जुन हजेरी लावतात. पारनेर तालुक्यात भाजपला ताकद देण्यासाठी त्यांचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. तथापि, असे असतानाही शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वतंत्र वज्रमुठ भाजपला फोडता आली नाही. पारनेरमध्ये भाजपला वेगळा चेहरा अद्यापही पुढे आणता आला नाही.

या उलट तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी अनेक वर्षे विधानसभा गाजविली. आमदार लंके यांच्या रुपाने राष्ट्रवादीला या वेळी आमदारकी मिळाली. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच सध्या तरी या तालुक्यात झुंज सुरू आहे. भाजप या स्पर्धेत केव्हाच मागे फेकले गेले आहेत.

मग विखे पाटील व लंके यांच्यात वाकयुद्ध कशामुळे सुरू आहे, हे गुलदस्त्यात आहे. आगामी काळात विधानसभेसाठी राष्ट्रवादीने पारनेर विधानसभा मतदारसंघात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्यासारख्या नेत्यांचे नाव पुढे केल्यास आश्चर्य वाटू नये. असे झाले, तर लंके यांच्याकडे लोकसभेची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहे. 

लंके यांची दक्षिणेतील श्रीगोंदे, कर्जत, पाथर्डी तालुक्यात लोकप्रियता चांगली आहे. या तालुक्यांतील कार्यक्रमास लंके आवर्जुन उपस्थित राहत आहेत. कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामांमुळे लंके यांचा देशभरात डंका वाजला आहे. नगर शहरातही त्यांचे अनेक फॅन आहेत. त्यामुळे लंके यांच्या कार्यकर्त्यांना लोकसभेचे स्वप्न पडू लागले आहेत. आगामी काळात खासदार विखे यांना आमदार लंके हे स्पर्धक होऊ शकतात, अशीच चर्चा सुरू झाली आहे.

 

हेही वाचा..

... तर जिल्ह्यात ताकद दाखवून देऊ ः आमदार लंके

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख