कोरोनाच्या लढ्यातही हिवरेबाजारचे काम आदर्शवत, पंतप्रधान कार्यालयाकडून दखल - Even in the battle of Corona, the work of Hivrebazar is ideal, noted by the Prime Minister's Office | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या लढ्यातही हिवरेबाजारचे काम आदर्शवत, पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

दत्ता इंगळे
शुक्रवार, 21 मे 2021

कोरोनाला 2020मध्ये हिवरेबाजारमध्ये प्रवेश करता आला नव्हता. मात्र, या वर्षी 20 मार्चला हिवरेबाजारमध्ये एक कोरोनाबाधित आढळला. दोन एप्रिलला दुसरा रुग्ण आढळून आला.

नगर तालुका : आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित 20 रुग्ण आढळले होते. त्यामुळे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी गावात चार पथके तयार केली. या पथकांनी केलेल्या कामातून व ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीतून हिवरेबाजार कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही देशात आदर्श ठरले आहे. या गावाच्या यशाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. (Even in the battle of Corona, the work of Hivrebazar is ideal, noted by the Prime Minister's Office)

कोरोनाला 2020मध्ये हिवरेबाजारमध्ये प्रवेश करता आला नव्हता. मात्र, या वर्षी 20 मार्चला हिवरेबाजारमध्ये एक कोरोनाबाधित आढळला. दोन एप्रिलला दुसरा रुग्ण आढळून आला. तो मात्र अत्यवस्थ होता. त्यामुळे पोपटराव पवार यांनी कोरोनामुक्‍ती ग्राम सनियंत्रण समितीची तातडीची बैठक घेतली. कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण पथक, वाहनधारकांचे पथक, कोविड हेल्पलाइन पथक, अशी गावातील तरुणांची चार पथके स्थापन केली. 

सर्वेक्षण पथकाने 23 एप्रिलपर्यंत गावातील प्रत्येक व्यक्‍तीची कोरोना तपासणी केली. कोमॉर्बिडिटी रुग्णांची नावे व दूरध्वनी क्रमांकाची स्वतंत्र यादी तयार केली, तसेच संशयित 149 व्यक्‍तींची अँटिजेन तपासणी केली. यात बाधित आढळून आलेल्यांची विलगीकरण पथकाने गावातीलच विलगीकरण कक्षात रवानगी केली. या बाधित व त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींना आणण्याचे काम वाहनचालक पथकाने केले. त्यामुळे संबंधितांच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची बाधा झाली नाही. कोविड हेल्पलाइन पथकाने विलगीकरण कक्षात बाधित व त्यांच्या संपर्कातील, बाहेरगावांहून आलेले यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले. गावातील दोन कुटुंबे पूर्णपणे बाधित निघाली होती. त्यांची शेतीची व दुग्धव्यवसायाची कामे पथकाने केली. 

या चारही पथकांतील एकही जण कोरोना बाधित झाला नाही. गावातील नागरिकांनीही विशेष दक्षता घेतली. आज गावातील 71 जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली; त्यात कोणीही बाधित आढळले नाही. 

जिल्हाधिकाऱ्यांनी मिळविली शाबासकी 

ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिवरेबाजारमधील कोरोनामुक्‍तीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. या लढ्यावर खूष होत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. 

हिवरेबाजारप्रमाणे गावातील प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त पाळल्यास कोरोनासारखे मोठे संकटही दूर लोटता येऊ शकते. कोरोनात सर्व गावांनी हिवरेबाजारप्रमाणे कोरोनामुक्‍तीसाठी पथके तयार करून काम केल्यास ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार होईल. 
- पोपटराव पवार, राज्य कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमिती. 

म्युकरमायकोसिसचा रुग्णही आढळला 

कोरोनातून बऱ्या झालेल्या कोमॉर्बिडिटी रुग्णांशी पोपटराव पवार ऑनलाइन संपर्क साधतात, तसेच गावातील सर्व नागरिकांना दिवसातून दोन वेळा ऑनलाइन संदेश पाठवितात. यातून म्युकरमायकोसिस आजारासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यातून एका रुग्णाने म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे सांगतातच उपचार सुरू करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने रुग्ण बचावला. 

हिवरेबाजारची कोरोनामुक्‍ती 

अँटिजेन चाचण्या - 220 
कोरोना लसीकरण - 203 (पहिला डोस घेतलेले 192, दोन्ही डोस घेतलेले 11) 
कोरोनाबाधित - 20 
बरे झालेले - 19 
मृत - 1 

 

हेही वाचा...

संकटात पुढाऱ्यांनी पुढे यावे

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख