राष्ट्रवादीपुढचा पेच वाढला ! संपलेलो नाही; ‘झेडपी’सह विधानसभाही लढू, भोस पुन्हा मैदानात उतरणार - The crisis facing the NCP has increased! Not over; I will also fight the assembly with 'ZP', Bhose will return to the field | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

राष्ट्रवादीपुढचा पेच वाढला ! संपलेलो नाही; ‘झेडपी’सह विधानसभाही लढू, भोस पुन्हा मैदानात उतरणार

संजय आ. काटे
बुधवार, 21 जुलै 2021

सलग २९ वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिलो. अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर काम केले. त्यातून मांडवगण जिल्हा परिषद गटासोबतच तालुक्याच्या विकासाला हातभार लावला.

श्रीगोंदे : ‘‘तालुक्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणात येऊन ४२ वर्षे झाली. आपले वय झाले. आता निवडणूक लढणार नाही या भ्रमात काही नेते आहेत. तथापि, आपण राजकारणातून अजूनही संपलेलो नाही, हे दाखविण्यासाठी जिल्हा परिषदेनंतर विधानसभाही लढविणार आहोत,’’ असा इशारा देत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी राष्ट्रवादीपुढचा पेच वाढविला आहे. (The crisis facing the NCP has increased! Not over; I will also fight the assembly with 'ZP', Bhose will return to the field)

भोस म्हणाले, ‘‘सलग २९ वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिलो. अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर काम केले. त्यातून मांडवगण जिल्हा परिषद गटासोबतच तालुक्याच्या विकासाला हातभार लावला. विधानसभाही लढलो. मात्र यश आले नाही. त्याची कारणे वेगवेगळी असली, तरी दर वेळी सामान्य जनता आपल्यासोबत राहिली.’’

‘‘गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्नुषा गौरी भोस हिला मांडवगण जिल्हा परिषद गटातून भाजपची उमेदवारी होती. लोक शेवटपर्यंत आपल्यासोबत राहिले. मात्र, निकालावेळी नेमके काय झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही. जय-पराजय मान्य करावा लागतो. कारणे देऊन काही उपयोग नाही,’’ असे ते म्हणाले.

‘‘तालुक्याचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर आपण त्यांच्या जागी राहत राजेंद्र नागवडे व राहुल जगताप यांच्या पाठीशी राहिलो. या दोघांनी एकत्र राजकारण करावे, हे आपले मत आजही कायम आहे. त्यांची वैयक्तिक अडचण अथवा पक्षाची काही धोरणे वेगळी असली, तरी आपण त्यासाठी प्रयत्न करू. मात्र, आता आपल्यालाच बेदखल करण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने, माझ्या हितचिंतकांसाठी पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. मांडवगण जिल्हा परिषद गटातून यावेळी आपण स्वत: लढणार आहोत. समोर कोण आहे, याचा विचार कधीच केला नाही; याही वेळी करणार नाही. आपली लढाई कुणा व्यक्तिविरोधात नसून, गटातील विकासासाठी आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

आपण राष्ट्रवादीतच ः भोस

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांशी बांधील असल्याने राष्ट्रवादीत आहोत. जिल्हा परिषदेला डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. तसे झाल्यास विधानसभेचीही तयारी करून ताकद दाखवू. शेवटपर्यंत लढण्याची जिद्द आहे. लोक आपल्याशी प्रामाणिक आहेत. समोर भाजप आहे की काँग्रेस, याचा विचार करणार नाही, हे नेत्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही भोस यांनी दिला.

 

हेही वाचा..

बीड-नगर जिल्ह्यासाठी मोठा निर्णय

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख