चोरी हा गुन्हा आहेच, पण चोरीचा माल विकत घेणे त्यापेक्षा मोठा गुन्हा! 

अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत 'टॉर्च'चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी त्यांच्याबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते?
  Ajit Pawar, Chandrakant Patil .jpg
Ajit Pawar, Chandrakant Patil .jpg

मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. पाटलांनी याप्रकरणी 'आ बैल मुझे मार' असेच केले आहे . अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत 'टॉर्च'चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी त्यांच्याबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा. एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर 'लेटर बॉम्ब' टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला. (Shiv Sena criticizes BJP)

मागील काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये वाद रंगला आहे. त्यावर शिवसेनेने सामनाच्या आग्रलेखातून भाष्य केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, गांभीर्य आणि संयम हे महाराष्ट्रातील राजकारणाचे वैशिष्टय आहे. खासकरून राज्यात कोरोना महामारीसारखे भयंकर संकट असताना राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी संयम राखणे गरजेचे आहे. नाहीतर जनता त्यांना गांभीर्याने घेण्याचे बंद करेल. उचलली जीभ लावली टाळयाला असला प्रकार सध्या विरोधी पक्षाने सुरू केला आहे. भाजपचे (Bjp) नेते आजही दीड-दोन वर्षांपूर्वीच्या 'अजित-देवेंद्र' यांच्या शपथविधीच्या पहाट सोहोळयातच गुंतून पडले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले केले. त्यांनी आता सांगून टाकले, अजित पवारांबरोबर घाईघाईत सरकार बनवले ही आपली चूक होती. असे केल्याने आपल्या प्रतिमेस तडा गेल्याचेही त्यांनी मान्य केल्याने त्यांच्यापुरता या प्रकरणावर पडदा पडला, पण चंद्रकांतदादा पाटील यांना मात्र त्यांचे मन त्या पहाटेच्या गुंत्यातून बाहेर पडू देत नाही. राजकारणातील गुंत्यात इतके अडकून पडणे बरे नसते, पण पाटलांना हे सांगायचे कोणी! असा टोला शिवसेनेने लगावला आहे. 

पाटील यांनी आता असा स्फोट केला आहे की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांनी जे 54 आमदारांच्या सहीचे पत्र भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केले तो एक घोटाळा आहे. हे पत्र अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरले. हे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला. पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे. राजकारणात आणि युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो. त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते. अजित पवारांचे ते पत्र हा भाजप व अजित पवारांतील गुप्त करार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा होता, असेही म्हटले आहे. (Shiv Sena criticizes BJP)

पाटलांनी अकारण भांडाफोड करून आपण भविष्यात मोठे राजकारण करण्यास सक्षम नसल्याचे दाखवून दिले. गोपनीय गोष्ट घडली व त्यातून यश प्राप्त झाले नाही तरी त्या गोपनीयतेचा बोभाटा होणे योग्य नाही. पण भडकलेल्या चंद्रकांत पाटलांनी एका तिरमिरीत पहाटेच्या शपथविधीचे सर्व गुप्त कट लोकांसमोर आणले. पण, त्यांच्या भांडाफोडीत इतरही अनेक कंगोरे आहेत. अजित पवार यांनी डॉवरमधून पत्र चोरले हा आरोप निव्वळ भंपक आहे. आमदारांच्या सहीचे पत्र अजित पवारांना चोरण्याची आवश्यकता नाही. जेव्हा पहाटेचे हे उद्योग सुरू होते तेव्हा अजित पवार हे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले होते व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे असणार. पत्र चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे. 

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करून राजकीय गुजराण करण्यातले अजित पवार नाहीत. पहाटे त्यांनी एक प्रयोग केला तो फसला. असे प्रयोग देशाच्या राजकारणात अधूनमधून होत असतात. दुसरे असे की, अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. अजित पवारांनी पत्र चोरले हे अनैतिक असल्याचा पाटलांचा दावा मान्य केला तरी ते चोरलेले पत्र भाजप नेत्यांनी स्वीकारणे, त्यावर विश्वास ठेवून ते राज्यपालांकडे सुपूर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हे फक्त अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरदेखील ठरत असल्याचे म्हटले आहे. 

शिवाय हा मोठा अपराधदेखील आहे! चोरी गुन्हा आहेच, पण चोरीचा माल विकत घेणे त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे चोरलेल्या पत्राचा राजकीय व्यापार करणाऱ्या भाजप व त्यांच्या पुढाऱ्यांना निवडणूक आयोगाने व पोलिसांनी फौजदारी गुन्हेच दाखल केले पाहिजेत. पाटलांनी याप्रकरणी 'आ बैल मुझे मार' असेच केले आहे. अजित दादा मोठया पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत 'टॉर्च'चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.  

एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर 'लेटर बॉम्ब' टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला. पुन्हा दादा एकीकडे अजित पवारांवर पत्र चोरीचा आरोप करतात, तर दुसरीकडे शिवसेनेने 'दगा' दिला म्हणून शिवसेनेला धडा शिकविण्याचा प्रयत्न भाजपने केला, असेही सांगतात. हा प्रयत्न फसला असेही मान्य करतात. मुळात राजकारणात अशा असलेल्या-नसलेल्या गोष्टी कितीही उगाळल्या तरी त्यातून मनस्तापाशिवाय काहीच हाती लागत नाही. चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ नेत्याला हे सांगण्याची तशी गरज नाही. सत्ता गेल्याचे शल्य ठीक आहे, पण दादा अशी किती तगमग करून घेणार आहात? खरे म्हणजे राजकारणात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही एक महत्त्व, स्थान आहे. मात्र विरोधी पक्षच गांभीर्याने न वागता उथळपणे वागू लागला तर त्यांचे महत्त्व, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आपोआपच कमी होतो. भाजपने विश्वास गमावला याचे मूळ त्यांच्या स्वभावात आहे. दिलेले शब्द पाळायचे नाहीत हे तर आहेच, पण जे घडलेच नाही तेच सत्य असल्याचे ओरडत राहायचे हे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्राचे राजकारण त्यामुळेच बदलले, हे मात्र नक्की!  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com