खासदाराशी वाद वाढवून राज्यपाल पडले तोंडघशी - Twitter war in Governor Jagdeep Dhankhar and MP Mahua Moitra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

खासदाराशी वाद वाढवून राज्यपाल पडले तोंडघशी

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जून 2021

राज्यपालविरूद्ध मुख्यमंत्री हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचाराला राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankhar) यांनी थेट तृणमूल काँग्रेसला दोषी धरलं. त्यावरून आता जोरदार ट्विटर वॅार सुरू झालं आहे. राजभवनामध्ये राज्यपालांच्या सहा ओएसडींच्या नियुक्तीवर तृणमूलने बोट ठेवत घराणेशाहीचा आरोप केला. त्यावर राज्यपालांनी जातीचे कार्ड बाहेर काढले. (Twitter war in Governor Jagdeep Dhankhar and MP Mahua Moitra)

तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. मोईत्रा यांनी राज्यपालांच्या ओएसडीच्या नावांची यादीच ट्विटरवर टाकली. यामधील काही जण राज्यपालांचे नातेवाईक आहेत, तर काही जण त्यांच्या जवळच्या परिचयातील आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. मोईत्रा यांनी केलेल्या आरोपांवर धनकर यांनी आज ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. त्यांनी थेट जातीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

हेही वाचा : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्रातर्फे मोफत लस; मोदींची मोठी घोषणा

सहा ओएसडी हे नातेवाईक असल्याची माहिती चुकीची आहे. ते ओसीडी तीन वेगळ्या राज्यांतील आहेत. त्यातील चार वेगळ्या जातीचे आहेत. कोणीही माझे जवळचे नातेवाईक नाही. त्यातील चार तर माझ्या जातीचे किंवा राज्यातील नाहीत, असे ट्विट राज्यपालांनी केलं आहे. राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरील लक्ष्य विचलित करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे. 

काही वेळातच मोईत्रा यांनी धनकर यांच्या ट्विटरला उत्तर दिलं आहे. त्यांनी राजभवनच्या संकेतस्थळाची लिंक शेअर केली असून त्यामध्ये सर्व ओएसडींची नावे देण्यात आलेली आहेत. त्यांची नियुक्ती कुणी आणि कशी केली, याची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. खोटेपणा शेवट, असे म्हणत त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. 

दरम्यान, मोईत्रा यांनी ट्विट केलेल्या कागदपत्रांमध्ये सहा जणांची नावे आहेत. त्यामध्ये अभुद्योय सिंग शेखावत, अखिल चौधरी आणि किशन धनकर हे राज्यपालांच्या जवळचे नातेवाईक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रूची दुबे, प्रशांत दिक्षित आणि श्रीकांत जनार्दन राव हे राज्यपालांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींचे नातेवाईक असल्याचा दावाही मोईत्रा यांनी केला आहे. मोईत्रा यांच्या या ट्विटमुळे बंगालमध्ये राज्यपालविरूद्ध मुख्यमंत्री हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख