महाराष्ट्राबद्दल बोलण्याआधी गुजरातसह भाजपशासित राज्यांकडे पाहा; रोहित पवारांचे फडणवीसांना उत्तर

ज्या राज्याचे आपणही नागरिक आहात त्या राज्यात आणि राजधानीत कोरोनाचा आलेख स्थिरावतोय ही बाब आपल्याला आनंद देणारी का नाही? हे समजत नाही''
 Rohit Pawar, Devendra Fadnavis .png
Rohit Pawar, Devendra Fadnavis .png

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले होते. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित फडणवीस यांना उत्तर दिले आहे. पवार यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Rohit Pawar's criticism of Devendra Fadnavis)

पत्रामध्ये रोहित पवार म्हणाले की, ''महाराष्ट्रातील भाजपच्या एका प्रमुख नेत्याने काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र माझ्या वाचनात आले. त्यात राज्य सरकार करत असलेल्या उपाय योजनांबाबत काही आक्षेपार्ह मुद्दे निदर्शनास आले. याबाबत लिहावे की नको अशी द्विधा मनःस्थिती होती, पण राज्य सरकार, आरोग्य आणि इतर यंत्रणा कसे काम करतायेत हे मी जवळून पाहतोय. त्यांच्या या कष्टावर राजकीय हेतूने कुणी पाणी फिरवत असेल तर ते योग्य नाही म्हणून आणि वस्तुस्थिती पुढे यावी म्हणून मी हे लिहितोय. विरोधासाठी विरोध करणे चुकीचे आहे, त्याने लोकांचा काही फायदा होत नसतो, अशी शिकवण लहानपणापासून मला आहे. त्यामुळे असा विरोध कुणी करत असेल तर तेही लोकांसमोर आले पाहिजे. तसंच या पोस्टमधून कुणावर टीका करणे हाही माझा हेतू,'' नसल्याचे पवार म्हणाले. 

''पत्रात मे महिन्यातील १३ तारखेचा दाखला देत महाराष्ट्रामध्ये एकूण संक्रमणाच्या २२ टक्के संक्रमण असल्याचा दावा करण्यात आला होता. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अधिक असल्याने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरवातीपासूनच रुग्ण संख्या अधिक होती. आजही सक्रिय रुग्णांची संख्या पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या महानगरात अधिक आहे. इतर राज्यांमध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याने स्वाभाविकच रुग्ण संख्याही कमी दिसते. मात्र, आपल्या राज्याने आधीपासूनच टेस्टिंग आणि ट्रेसिंग वर भर दिल्याने रुग्ण संख्या जास्त दिसते. या परिस्थितीत केंद्राने मदत केली नाहीच पण आर्थिक नुकसानीची भरपाई, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनमध्येही खूप चांगला न्याय दिला, असे नाही. त्याचबरोबर जिनोम सिक्वेन्सिंग च्या संशोधनात ही केंद्राकडून विलंब झाला. मात्र आज ते बोलायची वेळ नाही''.

''पत्रामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्व मदत केल्याचा दावा करण्यात आला, पण मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आता लस वाटपापर्यंत महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्राची रुग्ण संख्या सर्वाधिक असूनही भाजपशासित राज्यांना प्राधान्य देण्यात आले'', असा आरोप पवार यांनी केला आहे. ''केंद्रीय अर्थसंकल्पात ३५००० हजार कोटींची तरतूद असतांनाही आर्थिक अडचणीतून जात असणाऱ्या राज्यांवरच लसीकरणाचा अधिकचा भार केंद्राने टाकला. पहिल्या लाटेनंतरही केंद्राला निर्णायक धोरण आखायला विलंब लागल्यामुळे पुरेसा वेळ हातात असतांनाही आपली देशाची लसीकरण क्षमता वाढवली नाही. तरीही राज्य शासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहे. खाजगी लॅब्स ला सरकारने 'टेस्ट करू नका' असे आदेश दिले नाहीत. ज्याला चाचणी करायचीय त्याला ती करता येते. काही दिवसांपूर्वी देशातल्या बहुतांश भाजप शासित राज्यांमध्ये खाजगी लॅब्सला कोव्हीड तपासणीसाठी बंधने घालून रुग्णांची संख्या घटवण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाला होता''. मात्र याबद्दल मला काहीच म्हणायचे असेही पवार म्हणाले.  (Rohit Pawar's criticism of Devendra Fadnavis)

''पत्रात राज्य सरकारने मुंबईची मृत रुग्णांची आकडेवारी लपवल्याचाही आरोप केलाय. मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने सातत्याने उपाय योजना करून मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात आणला याचे त्यांना कौतुक नाही. ज्या राज्याचे आपणही नागरिक आहात त्या राज्यात आणि राजधानीत कोरोनाचा आलेख स्थिरावतोय ही बाब आपल्याला आनंद देणारी का नाही? हे समजत नाही'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

''भाजपशासित गुजरातमध्ये 1 मार्च ते 10 मे 2021 दरम्यान 1 लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्र दिले आणि प्रत्यक्षात मात्र या कालावधीत केवळ 4218 मृत्यू कोरोनाने झाल्याची नोंद केली. पण गेल्या वर्षी याच कालावधीत दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली तर यंदा तब्बल 1. 20 लाख मृत्यूचे दाखले अधिक देण्यात आले. याचे गौडबंगाल काय?'' यावर राज्यातील विरोधी का पक्ष गप्प आहे?

''आकडेवारी कमी दिसावी म्हणून महाराष्ट्रात आकड्यांमध्ये फेरफार केलेला नाही. कोणतीही आकडेवारी लपवली नाही. जे सत्य आहे ते स्वीकारून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपले महाविकास आघाडी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आजची वेळ ही राजकारण करण्याची नसून या संकटाला रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आहे. आज खरंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीचा पाठपुरावा करणे आवश्यक असतांना आजपर्यंत एकाही नेत्याने ते धारिष्ट्य दाखवल्याचे दिसत नाही पण राज्य संकटात असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी केंद्राच्या PM CARE मध्ये मदत जमा करण्याचे मात्र त्यांनी न विसरता आवाहन केले.  

सोनियाजी गांधी यांना लिहिलेल्या पत्रात राज्यात आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचा आणि राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा दावा केला. पण या गोष्टीमध्ये तथ्य असते तर आज या विभागातील प्रमुख शहरे सोडली तर इतर ठिकाणची रुगणसंख्या स्थिरावताना दिसली नसती''. 

''आज महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर अर्ध्यावर आला असून मुंबईतही रुग्ण वाढीचा दर झपाट्याने कमी होतोय. याउलट भाजपशासित कर्नाटकसह अनेक राज्यात कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. आज राजकीय आरोप करत असतांना आपल्या पक्षाचे सरकार ज्या राज्यांमध्ये आहे तिथल्या परिस्थितीचा आपण नीट अभ्यास केल्यास तेथील यंत्रणा किती मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाली ही आपल्या लक्षात येईल. उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमधील रुग्ण प्रवास करून महाराष्ट्रात उपचारासाठी येत आहेत. तिथं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुऱ्या पडत असून अनेक मृतदेह गंगा किनारी पुरले जात असल्याचे तर काही नदीत ढकलले जात असल्याचे विदारक चित्र संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. असो. याचे भान तिथल्या राज्यकर्त्यांना असायला हवे, पण त्यांना सांगणार कोण?'', असा टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. (Rohit Pawar's criticism of Devendra Fadnavis)

''इथले विरोधक राज्य सरकारवर टीका करत असताना खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजनांची जाहीर प्रशंसा केली. सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट व ऑक्सिजन पुरवठ्याची स्तुती केली. जागतिक अर्थतज्ञ आणि 'आरबीआय'चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकले, पण इतर राज्यांना तेही करता आले नाही, असे म्हटलंय. मात्र, तरीही राज्यातील भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत, हे दुर्दैवी आहे. एक मात्र खरंय की देशात सर्वाधिक रुग्ण असतानाही आपल्याकडे रुग्णांना बेड मिळाले नाहीत, असे घडले नाही. पण भाजपशासित राज्यांमध्ये तर मंत्र्यांच्या नातेवाईकांनाही बेडसाठी तरसावे लागले आणि कित्येक रुग्णांनी उपचाराअभावी जगाचा निरोप घेतला, याबाबत ते का बोलत नाहीत?'', असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

''त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोनाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करताना दिसतात, किंबहुना 'आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण करू नका,' अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांची एका कार्यक्रमात कानउघाडणीही केल्याच्या बातम्या मी वाचल्या आहेत. मात्र तरीही चांगल्या गोष्टीचे कौतुक करण्याची आणि राजकारण न करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस काही फिटत नाही. आज राज्यातील अनेक प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत याबाबतही त्यांनी एखादे पत्र केंद्र सरकारला लिहिले तर राज्यातील जनता निश्चितच त्यांचे स्वागत करेल!'' असे पवार म्हणाले आहेत.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com