गंगेत मृतदेह : मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

गंगा नदीत शेकडो मृतदेह वाहत असल्याचे आढळून आले आहे.
CM Yogi Adityanath has admitted that bodies are flowing in the river Ganga
CM Yogi Adityanath has admitted that bodies are flowing in the river Ganga

लखनऊ : गंगा नदीत (Ganga River) शेकडो मृतदेह वाहत असल्याचे आढळून आले तरी त्याकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारला (Yogi Adityanath) आता जाग आली आहे. नदीच्या किनारीही हजारो मृतदेह पुरले जात असल्याचे उघडकीस आले होते. सुरूवातीला आर्थिक कारण आणि परंपरेचा आधार घेणाऱ्या योगी सरकारला गंगेचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी तातडीने अंत्यसंस्काराचा खर्च न परवडणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येका पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (CM Yogi Adityanath has admitted that bodies are flowing in the river Ganga)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'या मृतदेहांमुळे गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून, गंगेचे पावित्र्य धोक्यात येत आहे.' गंगेत मृतदेह वाहू लागल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने योगी सरकारला नोटीस बजावली होती. पण या घटनेवर सरकार जवळपास पाच दिवस मौन धारण केले होते. सुरूवातीला बिहारकडे बोट दाखविण्यात आले होते. पण उत्तर प्रदेशातील वास्तव समोर आल्यानंतर ही स्थिती मान्य करण्यात आली. सुरूवातीला आर्थिक कारणांवरून परंपरेतूनही ते गंगेत सोडले जात असल्याचे वक्तव्य करण्यात आले होते. आता अंत्यंसंस्काराचा खर्च न परवडणाऱ्या नागरिकांना त्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आदेशही सरकारने दिले.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा कहर सुरू असला तरी मृतांच्या आकड्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा दावा केला जात आहे. कारण गंगा नदी किनारी हजारो मृतदेह पुरल्याचे तसेच अनेक मृतदेह गंगेत सोडून दिल्याचे वास्तव समोर आले आहे. या मृतदेहांची नोंद योगींच्या सरकार दफ्तरी आहे किंवा नाही, याबाबत प्रशासनही हात वर करत आहे. त्यामुळे गंगा नदी किनारी वसलेल्या गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

उत्तर प्रदेशमधील २७ जिल्ह्यांमधून गंगा नदी वाहते. यांपैकी अनेक जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती भयावह असल्याचे समोर आले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने तीन दिवसांपूर्वी केलेल्या पाहणीमध्ये हे वास्तव समोर आले आहे. जवळपास अकराशे किलोमीटर अंतरात दोन हजारांहून अधिक मृतदेह पुरण्यात आल्याचे दिसून आले आहे. यातील अनेक मृतदेह नदीच्या प्रवाहात गेल्याचे तर काही ठिकाणी नदीत सोडून दिल्याचेही दिसते. 

उन्नावमध्ये ९०० हून अधिक मृतदेह

उत्तर प्रदेशातील उन्नावमधील शुक्लागंज घाट आणि बक्सर घाट परिसर सर्वात मोठे स्मशान बनले आहे. या भागात ९०० हून अधिक मृतदेह पुरण्यात आले आहेत. पावलागणित मृतदेह पुरण्यात आल्याचे दिसते. अनेक मृतदेहांवरील माती गेल्याने ते उघडे पडले आहेत. प्रशासनाकडून या मृतदेहांवर पुन्हा माती टाकली जात असल्याचे दिसून आले. 

कानपूरमध्येही भयावह स्थिती 

कानपूरमधील शेरेश्चवर घाटाजवळ जवळपास ४०० मृतदेह पुरण्यात आले आहेत. तर कन्नोजमधील महादेवी गंगा घाटाजवळ सुमारे ३५० मृतदेह पुरण्यात आल्याचे दिसून आले. जे मृतदेह नदीच्या किनारी पुरले जात आहेत, ते नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर प्रवाहात वाहत जातात. नदी किनारी असलेल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती असल्याची स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

तसेच बिजनोर, मेरठ, मुजफ्फरनगर, बुलंदशहर, हापुड, अलीगड, कासंगज, संभल, अमरोहा, बदांयू, शाहजहांपूर, हरदोई, रायबरेली, फेतहपुर आदी जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती दिसून येत असल्याचे पाहणीत आढळले. पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांतील स्थिती सध्या काही प्रमाणात सुधारली आहे. या जिल्ह्यांमध्ये नदी किनारी केवळे एक-दोन मृतदेहच आढळून येत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील या स्थितीची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली असून केंद्र सरकार, बिहार व उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com