रामदास आठवले या कारणासाठी शरद पवारांना भेटणार   - Ramdas Athavale will meet Sharad Pawar on the issue of reservation in promotion and Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

रामदास आठवले या कारणासाठी शरद पवारांना भेटणार  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 जून 2021

या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट करावे.

मुंबई : पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा; अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकारची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही आठवले यांनी दिला. (Ramdas Athavale will meet Sharad Pawar on the issue of reservation in promotion and Maratha reservation)
 
पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे ता. 1 जून ते 7 जून दरम्यान आंदोलन सप्ताह राज्यभर पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइंचे मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे,  जिल्हाध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून झाला. 

हेही वाचा : पंतप्रधानांनाच्या भेटीआधी मुख्यमंत्री शरद पवारांशी चर्चा करणार 

या वेळी ऍड. अभया सोनवणे, रमेश गायकवाड, रमेश गौड, कृष्णा गौड, दिलीप व्हावळे, अशोक कांबळे, संदीप शिंदे, हरिबा कोंडे, भीमराव सवातकर, अनिल कोकणे, परशुराम माळी, नवनाथ बनसोडे, ओमप्रकाश यादव, तारबाई वानखडे, रमेश डाके, प्रशांत मोहिते, राजेंद्र जाधव, राजेश खंडागळे, रामराव खंडागळे, भागवत सोनवणे, विनय दवणेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे, त्यामुळे हे सरकार आरक्षणविरोधी आहे. या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सोनवणे यांनी केले.
 
बोरिवली आणि अंधेरी तहसील कार्यालयासमोर रिपाइंतर्फे आंदोलन करण्यात आले. अंधेरी तहसील कार्यालयासमारे मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मागणीसाठी आज कल्याणमध्ये जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, तालुकाध्यक्ष रामा कांबळे, रमेश बर्वे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात आटपाडी तहसील कार्यालयासमारे विशाल काटे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख