शब्द मागे घेतो! आदित्य ठाकरेंवर बोलून नितेश राणे तोंडघशी   - Nitesh Rane apologizes after criticizing Aditya Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

शब्द मागे घेतो! आदित्य ठाकरेंवर बोलून नितेश राणे तोंडघशी  

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे जास्तच आक्रमक झाले होते.

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा तोल गेला. मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले होते. यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. त्यानंतर नितेश राणे म्हणाले की भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो. ठाकरेंवरील आत्तापर्यंतच्या टीका पाहता, राणेंकडून दिलगिरीचा प्रकार पहिल्यांदाच असावा असे म्हटले जात आहे. (Nitesh Rane apologizes after criticizing Aditya Thackeray) 

हेही वाचा : मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

या सदर्भात नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता, तो बर्‍याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.   

प्रकरण काय? 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली.  आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. आणि विधानसभेच्या बाहेरच प्रतिविधनसभा भरवली. इथेच भाषण करत असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका केली होती. 

सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे जास्तच आक्रमक झाले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान राणे यांनी केले होते.  

हेही वाचा : वाजपेयी असते तर, या भाजप आमदारांना घरी पाठवले असेत!

नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक आक्रमक झाले. बुधवारी सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केले. नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी, इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावे, असे म्हटले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख