आता 'करेक्ट कार्यक्रम' कुठं? भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर जयंतराव अन् नाथाभाऊंमध्ये 'गुफ्तगू'

सांगली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी 'करेक्ट कार्यक्रम' करत भाजपला धक्का दिला होता.
NCP state chief Jayant Patil met Eknath Khadse in Mumbai
NCP state chief Jayant Patil met Eknath Khadse in Mumbai

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुंबईत निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. पण त्याआधी नाथाभाऊंच्या पिंपरी चिंचवडमधील समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढीलवर्षी पिंपरी चिंचवडसह पुणे, मुंबई अन्य प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत. नाथाभाऊंनी जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आज झालेल्या भेटीत कुठल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ची चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. (NCP state chief Jayant Patil met Eknath Khadse in Mumbai)

सांगली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी 'करेक्ट कार्यक्रम' करत भाजपला धक्का दिला होता. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात हा शब्द आता रुळला आहे. विरोधकांकडूनही पंढरपूरच्या विधानसभेच्या निवडणुकीत हा शब्द वापरण्यात आला. एकनाथ खडसे यांनी सांगलीप्रमाणेच जळगाव महापालिकेत चमत्कार घडवून आणत भाजपची सत्ता घालवली.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या राज्यभरातील शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आज पिंपरी चिंचवडमधील समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पिंपरीमध्ये भाजपची सत्ता असून येथील निवडणूकही पुढील वर्षी होणार आहे. या पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील व नाथाभाऊंमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी नाथाभाऊंच्या कत्न्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर उपस्थित होत्या. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

दरम्यान, भाजपच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा सारिका पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (ता.१९) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. त्यांना राष्ट्रवादीत आणल्याने नाथाभाऊ आता पिंपरी-चिंचवडमध्येही सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरील शहर भाजपमधील हे पहिले आऊटगोईंग आहे. दिवाळीनंतर असे अनेक फटाके फुटणार असल्याचे संकेत याअगोदरच मिळालेले आहेत.

आमदारकीची प्रतिक्षा 

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांचे नाव राष्ट्रवादी ने राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी दिले आहे. मात्र खडसे यांच्या सह 12 जणांच्या नावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने यासाठी पाठपुरावा केला जात आहे. पण अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नाथाभाऊंची विधीमंडळातील नव्या इनिंगची सुरूवात लांबणीवर पडत चालली आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com