राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर? राज्य सरकारकडून चाचपणी सुरू - Municipal elections in the state are likely to be postponed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर? राज्य सरकारकडून चाचपणी सुरू

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 जून 2021

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडसह प्रमुख महापालिकांचा यामध्ये समावेश आहे.

मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील जवळपास 10 महापालिकांच्या निवडणूका (Municipal Election) पुढीलवर्षी होणे अपेक्षित आहे. कोरोनाची दुसरी लाट (Covid-19) ओसरली असली तरी पुढील सहा महिन्यांनी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणही (OBC Reservation) रद्द केले आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढाही कायम आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून महापालिकांच्या निवडणूका किमान सहा महिने पुढे ढकलण्याची तयारी राज्य सरकारने केल्याचे समजते. (Municipal elections in the state are likely to be postponed)

राज्यात पुढीलवर्षी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूका होणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडसह प्रमुख महापालिकांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक मुदतीपूर्वीच घेण्याचा शिवसेनेचा डाव होता, पण कोरोनाच्या लाटेमुळे ते शक्य झाले नाही, असा आरोप भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नुकताच केला आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते. पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतही हीच स्थिती आहे. राज्यातील कोरोनामुळं मृतांचा आकडा एक लाखाच्या पार गेला आहे. 

हेही वाचा : ठाकरेंचा गैरव्यवहार उघडकीस करणार म्हणून गावबंद...सोमय्यांचा आरोप

कोरोनाची तिसरी लाट नोव्हेंबर महिन्यात येण्याची शक्य व्यक्त केली जात आहे. ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असेल. तसेच यामध्ये लहान मुलांना धोका असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतापासून तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणही रद्द केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही पेटला असून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्ष असलेल्या भाजपने उचलून धरला आहे. दोन्ही मुद्यांमुळे राज्य सरकारला महापालिका निवडणूकीत फटका बसण्याची भीती आहे. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये अनेक शहरांमध्ये एकमत नाही. स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची तयारी करण्यात येत आहे. तसेच देशात पाच राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर त्या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. 

अशा परिस्थितीत महापालिका निवडणूका घेतल्यास संबंधित शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारकडून कोरोनाचे कारण देत महापालिका निवडणुकी सहा महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्यादृष्टीने सरकारही सकारात्मक असल्याची चर्चा आहे. 

तर प्रशासकीय राजवट!

कोरोनामुळे महापालिका निवडणूक पुढे ढकलली गेल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. महापालिकेचा सर्व कारभार नियमानुसार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालविला जाईल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. तेवढ्या कालावधीसाठी किंवा त्याच्या आत शासन निवडणुका घेवू शकते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख