संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्टिफाईड गुंड अन् अजित पवार म्हणतात... - Dy CM Ajit Pawar reacts on MP Sanjay Rauts Certified goons comment | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्टिफाईड गुंड अन् अजित पवार म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 जून 2021

शिवसेना भवनासमोर बुधवारी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाला.

जालना : शिवसेना भवनासमोर बुधवारी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावरून भाजपने (BJP) शिवसेनेवर गुंडगिरी व सत्तेचा माज असल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी होय आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असे वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊतांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Dy CM Ajit Pawar reacts on MP Sanjay Rauts Certified goons comment)

अजित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, कुठलाही पक्ष असा गुंड वगैरे स्वत:ला म्हणून घेणार नाही. सध्या राज्याचे प्रमुख हे शिवसेनेचे नेते आहेत. कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे, कायद्याने राज्य चालवणं, नियमानं राज्य चालवणं, सर्व सहकाऱ्यांनासोबत घेणं, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यानुसार मुख्यमंत्री काम करत आहेत, असे पवार म्हणाले.

हेही वाचा : येडियुरप्पांवर टांगती तलवार; भाजपमध्ये पडले तीन गट

संभाजीराजे यांच्यासोबत मराठा आरक्षणाबाबत गुरूवारी झालेल्या बैठकीविषयी ते म्हणाले, बैठक समाधानकारक झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार यंत्रणांना पूर्णपणे कामाला लावले आहे. प्रत्येक विभागाशी संबंधित विषयावर मुख्यमंत्री पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मला आणि अशोक चव्हाण यांनाही काही सुचना दिल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.    

काय म्हणाले होते राऊत?

शिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी मोठा राडा झाला. याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना गुंडगिरी करते, होय करते. सत्तेचा माज मात्र चुकीचे आहे. काल जर सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर वेगळा प्रकार घडला असता. गुंडगिरीचे म्हणाल तर शिवसैनिक व शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल तर होय आम्ही गुंड आहोत.

आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राची अस्मिता व हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने त्यावेळी केंद्राविरोधात केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही गुंडगिरी आम्ही करत राहिलो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज आहे, असे राऊत म्हणाले. 

शिवसेना भवनासमोर काय घडले?

राम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये  (Shivsena mouthpiece Saamna) बोट ठेवण्यात आल्याने आज भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्यासह कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने फटकार मोर्चासाठी शिवसेना भवनसमोर जमले होते. शिवसेनेविरोधात घोषणा देत असतानाच तेथे शिवसेनेचे आमदार सदा सरणवकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. धक्काबुक्की, हाणामारीमुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख