मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच राज्यपालांवर टीका केली आहे. 'राज्यपालांनी आता अंत पाहू नये. अन्यथा प्रत्यक्ष भेटून त्यांना कधी सही करणार हे विचारावे लागेल,' अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांसह सरकारवर निशाणा साधला. राज्यपालांना धमकी देणाऱ्यांनी आधी नीतिमत्ता शिकावी, असा टोला त्यांनी लगावला.
राज्य शासनाकडून तीन महिन्यांपूर्वी राज्यपालांना 12 जणांची यादी दिली आहे. मात्र, अद्याप राज्यपालांनी ही यादी अंतिम केलेली नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री राज्यपालांच्या या भूमिकेवर सातत्याने टीका करत आहेत.
हेही वाचा : विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून फडणवीस म्हणाले...
काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले होते की, 'सर्व अटी-नियमांचे पालन करून राज्यपालांना 12 जणांची यादी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना याबाबत पत्र लिहिले आहे. तरीही राज्यपालांकडून सही करण्यात आलेली नाही. अजून किती वाट पहायची. आता अंत पाहू नये, अन्यथा त्यांना भेटून याबाबत विचारणा करावी लागेल.'
याबाबत फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, बारा आमदारांच्या मुद्यावर राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. योग्य न वाटल्यास सरकार पुढील कार्यवाही करू शकेल. पण राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना सरकारमधील मंत्री ज्या भाषेत धमक्या देतात, हे कोणत्या संविधानात बसते. ही कुठली नीतिमत्ता आहे? ते आधी शिका मग राज्यपालांवर बोला, अशी टीका फडणवीस यांनी केली.
दरम्यान, फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी केलेल्या तरतुदींची पत्रकार परिषदेत माहिती दिली. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काही नसल्याची टीका चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात महाराष्ट्र अन्याय झाला असं विरोधक बोलत आहे. महाराष्ट्रासाठी ३ लाख ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, रेल्वेच्या नव्या २ हजार किमी लाईन, जलशक्ती मंत्रालयाकडून ४ हजार कोटींची तरतूद, शेती आणि सिंचनासाठी ६७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी सन्मान निधीसाठी ६८२३ कोटी, अन्न सुरक्षा साठी १५३ कोटी, १ लाख ५३ हजार कोटी रस्ते महाराष्ट्राला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
Edited By Rajanand More

