देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण - Devendra Fadanvis meets NCP President Sharad Pawar in mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 मे 2021

फडणवीस यांनी ट्विटरवरून या भेटीची माहिती दिली.

मुंबई : मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून भाजप नेत्यांनी सरकारला घेरलं. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 31) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. (Devendra Fadanvis meets NCP President Sharad Pawar in mumbai)

फडणवीस यांनी ट्विटरवरून या भेटीची माहिती दिली. 'माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली,' असं ट्विट करत फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं आहे. पित्ताशयाच्या त्रासामुळे शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हे भेट झाल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : केंद्र सरकारचा आदेश धुडकावला; मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला

दरम्यान, शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडी सरकारशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचेही समजते. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राज्यात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकविणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांच्या ध्यानात आणून दिल्याचे सांगण्यात येत होते. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ''असे तुम्हाला सरकारकडून कळवण्यात आले आहे का, अफवांवर विश्वास ठेवू नका? अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते, त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. 

महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, (Maratha reservation) पदोन्नती आरक्षण, कोरोना, लसीकरण असे अनेक विषय आहेत, त्यावर चर्चा झाली. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या नाराजी संदर्भातील कोणत्याही चर्चा नाहीत. शरद पवार यांचा या सरकारला मनापासून पूर्ण आशीर्वाद असल्याचे राऊत यांनी सांगितले.    

आजारपणानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची पहिल्यादांच भेट घेतली होती. दोनही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ही नियमित भेट असली तरी राज्यातील गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यावर सध्या संकटांची मालिका सुरूच आहे. कोरोना संसर्गाशी लढा सुरू असताना नुकतेच तोक्ते चक्रीवादळाने राज्याला मोठा तडाखा दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने (Congress) पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा, असा हट्ट सरकारकडे धरला आहे. सरकारची कोंडी करणाऱ्या या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख