मुख्यमंत्र्यांना आमदारांची काळजी : `वर्षा`वर सलग तीन दिवस भोजनाच्या पंगती - cm Uddhav Thackeray invites all MLAs of ruling coalition for dinner | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना आमदारांची काळजी : `वर्षा`वर सलग तीन दिवस भोजनाच्या पंगती

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

या निमित्ताने आमदारांशी वैयक्तिक संवाद साधण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन महाविकास आघाडीतील सर्व आमदारांना सध्या स्नेहभोजन देण्यास सुरवात केली असून यासाठी विभागनिहाय आमदारांना बोलविण्यात येत आहे. तीन दिवस हा सोहळा चालणार आहे.

विधीमंडळाचे अधिवेशन येत्या एक मार्चपासून सुरू होत आहे. त्यात महाविकास आघाडी सरकार पडणार अशा चर्चा विरोधी पक्ष अधुनमधून करत असतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक आमदाराशी संवाद ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी सुरू केल्याचे या स्नेहभोजनातून दिसून आले.

पुणे, सातारा, सांगली, नगर आणि नागपूर या चार जिल्ह्यांतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या पक्षांच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी निमंत्रित केले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह या जिल्ह्यांतील इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

ही पण बातमी वाचा : आदित्य ठाकरे शिवसृष्टीला निधी देणार का?

या वेळी मुख्यमंत्र्यांनी जवळपास प्रत्येक आमदाराची वैयक्तिक ख्यालीखुशाला विचारली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशीही अनौपचारिकपणे बोलण्याची संधी काही नवीन आमदारांना मिळाल्याने ते देखील खूष होते. चार-पाच आमदारांच्या एका टेबलवर बसण्याची सोय केली होती. या प्रत्येक टेबलवर मुख्यमंत्र्यांनी पाच-सहा मिनिटे देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे अवांतर गप्पाही या निमित्ताने आमदारांना मारता आल्या. आमदारांच्या आपापसांतील गप्पांत वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण हिचा मृत्यू हा विषय देखील निघाला आणि त्यावरून अनेकांनी आपली खासगीतील मते व्यक्त केली. मात्र त्यावर आपल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलण्याचे आमदारांनी साहजिकच टाळले. 

बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार असे सलग तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या घरी हा भोजनसोहळा चालणार आहे. यात पाणीपुरीपासून ते पुरणपोळीपर्यंत सर्व पदार्थ असल्याचे सांगण्यात आले.  आमदारांसोबत त्या विभागातील मंत्र्यांनाही बोलविण्यात येते. त्यामुळे आमदारांनाही मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते आहे. हे स्नेहभोजन देण्यामागे कारण काहीही असले तरी आमदारांशी आपला संपर्क तुटू नये, याची काळजी मुख्यमंत्री या निमित्ताने घेत असल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. आमदारांची काही नाराजी तर नाही ना, याचीही चाचपणी या निमित्ताने होत असल्याचे एका आमदाराने सांगितेल. कोरोनाच्या या आधी आलेल्य लाटेत अनेक आमदारांना त्याची लागण झाली होती. या वेळी देखील मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संपर्क साधत त्यांची ख्यालीखुशाली विचारली होती. त्यांच्या संवादाच्या क्लिपही तेव्हा व्हायरल झाल्या होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख