आदित्य ठाकरे नाशिकच्या कलाग्राम, शिवसृष्टीला निधी देणार का? - Will Aditya Thakre sanction funds for nashik tourism. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे नाशिकच्या कलाग्राम, शिवसृष्टीला निधी देणार का?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

नाशिकमधील कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी ८ कोटी तर येवला शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रकल्पाबाबत चर्चा केली.

नाशिक : नाशिकमधील कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी ८ कोटी तर येवला शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. 

यावेळी भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांना प्रकल्पाबाबत निवेदन दिले. येवला येथील शिवसृष्टीबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहराच्या लौकिकात  भर व पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पास , प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चार कोटींना मान्यता आहे . या निधीत शिवसृष्टी प्रकल्प पुर्ण होऊ शकत नाही . कामाचा वाव , विस्तृत स्वरुप, सुशोभीकरणाच्या बाबी, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण विषयक अभ्यास, सुसाध्यतेची पडताळणी, संशोधनात्मक अभ्यासाचे स्वरुप पाहता या पुर्वी मान्यता दिलेला चार कोटी निधी अत्यंत तोकडा आहे. शिवसृष्टी प्रकल्प पुर्ण होण्यासाठी अधिक रकमेची आवश्यकता आहे. जिल्हाधिका-यांनी तसा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्याला  प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून ' दिल्ली हाट च्या धर्तीवर शहरात गोवर्धन येथे सन २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र निधी अभावी ते बंद पडले आहे . शहर व जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचा उद्देश आहे . या बाजारपेठेत आदिवासी बांधवानाही त्यांच्या कलेचे प्रदर्शन करता येईल. त्यांच्या कलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळेल. पर्यटन विकास महामंडळाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटनामध्ये भरीव वाढ होईल. 

या प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय इमारत , वर्कशॉप इमारत , खाद्य पदार्थासाठी गाळे व ९९ व्यापारी गाळ्यांचे काम पूर्ण झालेले आहे . मात्र प्रवेशद्वार , पुढील कुंपणभिंत , अंतर्गत रस्ता , बाहयविद्युतीकरण , पाणीपुरवठा इ.कामे पुरेशा निधी अभावी अपूर्ण आहेत . या अपूर्ण कामांसाठी आठ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. लवकरात लवकर कलाग्राम सुरु करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख