स्वत:च्या मखलाशीसाठी राऊत पदाचा गैरवापर करतात; चित्रा वाघ यांची टीका - BJP leader Chitra Wagh criticizes ShivSena MP Sanjay Raut  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

स्वत:च्या मखलाशीसाठी राऊत पदाचा गैरवापर करतात; चित्रा वाघ यांची टीका

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

समाजात तेड निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे म्हणजे घाबरणे कसे म्हणता येईल. 

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपल्या रोखठोक सदरातून स्वामी यांच्या मृत्यूबद्दल भाष्य करत नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (BJP leader Chitra Wagh criticizes ShivSena MP Sanjay Raut) 

या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. वाघ म्हणाल्या की ''सामना चे कार्यकारी संपादक तसेच सोनिया सेनेचे प्रवक्ते  संजय राऊत जी हे फादर स्टॅन स्वामी जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते. त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वृत्तपत्र सुरु केले होते. मात्र, त्या विचारांना बाजूला ठेवत स्वतःच्या मखलाशीसाठी राऊत याचा गौरवाप करत आहेत.

हेही वाचा : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राणेंच्या डोक्यावर सर्वाधिक कर्ज; गोयल दुसऱ्या स्थानी

भिमा कोरेगाव दगलीतील मुख्य आरोपी स्टॅन स्वामी यांना आपण आपल्या लेखनीतून ताकद देण्याचे काम केले, आणि त्यांची तुलना जॅर्ज फर्नांडीस यांच्याशी केली. त्याच बरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी फर्नांडीस यांना घाबरत होत्या. त्याच प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅन स्वामी यांना घाबरत असल्याचा जावाई शोध तुम्ही लावला. नक्षलवाद्यांना रसद पुरवणाऱ्या चीनी ड्रॅगनला मोदीजी घाबरत नाहीत. समाजात तेड निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे म्हणजे घाबरणे कसे म्हणता येईल,'' असा सवाल वाघ यांनी केला आहे.        

 राऊत काय म्हणालेत?

जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ८४ वर्षांच्या स्वामींना जामीन देण्याची विनंती केली होती. जर्मनीच्या मानवाधिकार आयुक्तांनी, संयुक्त राष्ट्रानेही विनवणी केली होती. पाण्याचा ग्लास उचलून तोंडासही लावू न शकणाऱ्या स्वामींना शेवटी तुरुंगातच मारण्यात आले. एल्गार परिषद एक जहर पसरवणारे थोतांडच होते, तेथील जहरी आरोळ्या व गर्जना ज्यांनी केल्या त्यांचे समर्थन करू नये. त्यानिमित्ताने नंतर जे घडविण्यात आले ते 'मुस्कटदाबी'चे षड्यंत्रच म्हणावे लागेल. सरकार उलथविण्याचा कट! राज्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र, देशद्रोह व देशविघातक कारवाया म्हणजे काय? जंगलातील आदिवासींना त्यांच्या हक्कांची, स्वातंत्र्याची जाणीव करून देणे म्हणजे देश उलथवून टाकणे झाले का? विद्रोहाची ठिणगी टाकून मने पेटवणे देशद्रोह कसा होऊ शकतो? नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्या कवितांचा अनुवाद जगभरात गेला. त्यांच्या कवितेतला विद्रोह कुणाला देश उलथवण्याचा प्रकार वाटला नाही.

हेही वाचा : राज ठाकरे म्हणाले; राज्यात केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु आह

गुलामांना गुलाम असल्याची जाणीव करून देणे म्हणजेच मानवता व स्वातंत्र्याचा लढा आहे, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले. तो काय देश उलथवून टाकण्याचा प्रयोग होता का? आग लावा त्या मंत्रालयाला असे म्हणून तरुणांचे रक्त पेटविणारे बाळासाहेब ठाकरे हे काय देश उलथवून टाकण्याचे कारस्थान रचत होते का? कम्युनिझमच्या प्रवाहांशी आपले मतभेद आहेत. माओवाद आणि नक्षलवाद हे भयंकर प्रकार आहेत. पण माओवाद्यांचा राजकीय पक्ष, संघटना, सत्ता, व्यवस्था जगात ठिक-ठिकाणी आहेत. ते सर्व लोक कश्मीरातील अतिरेक्यांपेक्षा भयंकर आहेत हे मान्य केले तरी ८४ वर्षांच्या विकलांग आणि हतबल स्वामींच्या तुरुंगातील हत्येचे किंवा मृत्यूचे समर्थन होऊ शकत नाही!, असे राऊत यांनी रोखठोक सदरातील लेखात म्हटलेले होते.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख