विनोद तावडेंना ती गर्दी नकोशी म्हणून घेतलाय 'सोशल' संन्यास... - Vinod Tawde stays away from social media | Politics Marathi News - Sarkarnama

विनोद तावडेंना ती गर्दी नकोशी म्हणून घेतलाय 'सोशल' संन्यास...

राजानंद मोरे
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

विनोद तावडे यांनी मागील पाच महिन्यांपासून सोशल मिडियावर एकही पोस्ट टाकलेली नाही. 

पुणे : विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर हरियानाचे प्रभारी पद देऊन पुनर्वसन करण्यात आलेले भाजपचे बडे नेते विनोद तावडे मागील पाच महिन्यांपासून सोशल मीडियापासून लांब आहेत. कृषी कायदे, मंत्री धनंजय मुंडे व संजय राठोड यांच्याबाबत निर्माण झालेल्या वादापासूनही ते दूर दिसतात. तसेच माध्यमांपासून ते दोन हात लांब राहत असल्याचेच सध्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, तावडेंनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. 

विनोद तावडे हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राहिले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव असून हरियानाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. तेव्हापासून ते नाराज असल्याचे बोलले जाते. पक्षांतर्गत विरोध तसेच शीर्षस्थानी जाण्याची आकांक्षा त्यांना भोवल्याचीही चर्चा आहे. 

तावडे यांची नाराजी दूर करण्यासाठी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना राष्ट्रीय सचिवपद देण्यात आले. याबाबत त्यांनी ट्विटरसह अन्य सोशल मिडियावर पक्ष नेतृत्वाचे आभारही मानले. त्यांनी 27 सप्टेंबरला हे ट्विट केले होते. तसेच फेसबुक व इन्स्टाग्रामवरही त्यांनी पोस्ट टाकली होती. त्यानंतर 29 सप्टेंबरला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन त्यांनी केले. सोशल मिडियावरील हा त्यांचा अखेरचा संदेश आहे. 

हेही वाचा : इंधन दरवाढीला हिवाळा कारणीभूत; पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

राष्ट्रीय सचिवपदानंतर नोव्हेंबरमध्ये तावडे यांच्या गळ्यात हरयाणाच्या प्रभारी पदाची माळ टाकण्यात आली. पण याबद्दल आनंद व्यक्त करणारा किंवा पक्षनेतृत्वाचे आभार मानणारा एकही संदेश त्यांनी सोशल मिडियावर शेअर केलेला नाही. ते 29 सप्टेंबरपर्यंत सोशल मिडियावर सक्रीय होते. पक्षाचे विविध कार्यक्रम तसेच राज्य, देशातील घडामोडींवर ते सोशल मिडियावर सतत लिहीत होते. पण त्यानंतर त्यांनी सोशल मिडियावर एकही पोस्ट टाकलेली नाही. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते राज्यासह देशातील घडामोडींवर आपले मत मांडताना दिसतात. राज्यात धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर भाजपच्या सर्वच नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारची पाठराखण केली. पण त्यापासून तावडे काहीसे लांबच राहिल्याचे दिसले. ते कोणत्याही मुद्यावर सक्रीयपणे सहभागी झाल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे तावडे पक्षनेतृत्वावर अजूनही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी भाजप करत असताना तावडे त्यात सक्रीय दिसत नसल्याने त्यांचा दुरावा ठळकपणे दिसतो. 

नाराजी नाही, पॉझ घेतलाय...

विनोद तावडे यांनी नाराज नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, 2011 पासून सोशल मिडियावर आहे. त्यावेळी वेगवेगळ्या पोस्ट टाकणे अनकॉमन होते. आता वॉर्ड स्तरावरला कार्यकर्ताही अशा पोस्ट टाकतात. त्यामुळे मी काही वेगळे करण्याचा प्रयत्न आहे. सोशल मिडियातही वेगळं काही करू शकतो, यावर विचार सुरू आहे. सगळ्यांसारखे त्या गर्दीतले आपण आहोत, असे वाटायला नको. कोणाचे भाषण सुरू झाले तर त्याची वॉच पार्टी करा, कुणाचे स्टेटमेंट आले तर त्यावर लगेच काहीतरी टाका, प्रचाराला गेलो त्याचे फोटो टाका, असे करायचे नाही. पुढील महिनाभरात पुन्हा नवीन पध्दतीने सोशल मिडियावर सक्रीय होईन, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील घडामोडींवर येथील स्थानिक नेते प्रतिक्रिया देत असतात. महाराष्ट्र भाजपचीही कामे येतात, त्यात सक्रीय असतो. माझ्याकडे राष्ट्रीय सचिव, हरियानाची जबाबदारी असल्याने 16-17 दिवस राज्याबाहेरच असतो.

- विनोद तावडे, भाजप नेते

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख