इंधन दरवाढीला हिवाळा कारणीभूत; पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

केंद्रीय अर्थमंत्र्यांसह पेट्रोलियम मंत्र्यांकडेही इंधन दरवाढकधी थांबणार, या प्रश्नाचे उत्तर नाही.
price is high due to increase in demand it happens in winter says dharmendra pradhan
price is high due to increase in demand it happens in winter says dharmendra pradhan

नवी दिल्ली : इंधन दरवाढीवर केंद्र सरकारने हात वर केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांसह पेट्रोलियम मंत्र्यांकडेही इंधन दरवाढ कधी थांबणार, या प्रश्नाचे उत्तर नाही. त्यामुळे अजब दावे केले जात आहेत. आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर थेट इंधन दरवाढीला हिवाळा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. हिवाळ्यामध्ये इंधनाची मागणी वाढल्याने दरवाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे तर शंभरवर पोहचले आहेत. डिझेल आणि गॅसचे दरही सातत्याने वाढत चालले आहेत. याविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून हात वर करण्यात आले आहेत. आज माध्यमांशी बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुन्हा एकदा नवे कारण दिले आहे. यापूर्वी बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ होत असल्याने भारतात दर अधिक असल्याचे म्हटले होते.

आज बोलताना प्रधान म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने देशातील ग्राहकांनाही त्याची झळ पोहचत आहे. हिवाळा संपल्यानंतर दर काही प्रमाणात कमी होतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाची मागणी वाढल्याने दरवाढ वाढले आहेत. हिवाळ्यामध्ये हे असे होतेच. दर कमी होतील.'' दरम्यान, प्रधान यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

दरवाढीविरोधात विरोधक रस्त्यावर

विरोधकांनी इंधन दरवाढीवर अनेक ठिकाणी आंदोलन केले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये स्कूटर पेटवून देत इंधन दरवाढीचा निषेध केला. तर केरळमध्ये काँग्रेसने रिक्षाला दोरी बांधून रस्त्याने फिरविली. खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक केरळ काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. 

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज घरापासून मंत्रालयापर्यंत सायकलवर प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध केला. काल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सिलेंडरवर बसून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल ई-स्कूटरवर कार्यालयात पोहचल्या. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीविरोधातील फलक गळ्यात अडकवला होता. तसेच काही अंतर त्यांनी स्वत: स्कूटर चालविली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांनीही काही दिवसांपूर्वी सायकवरून कार्यालयात गेले होते. 

अर्थमंत्र्यांनीही केले हात वर

दरम्यान, केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडून इंधन दरवाढीवर नियंत्रण आणणे केंद्र सरकारच्या हातात नसल्याचे म्हटले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे. इंधन दरवाढीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हात झटकले असून, सरकारच्या हातात काही नसल्याची भूमिका नुकतीच घेतली होती. 

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पेट्रोलच्या वाढत्या दरावर सरकारने नियंत्रण ठेवावे की नाही, हा त्रासदायक मुद्दा आहे. यावर कोणतेही उत्तर दिले तरी ते पटण्यासारखे नाही. यावर सर्वांना पटणारे केवळ एकच उत्तर असून, ते म्हणजे दर कमी करणे. प्रत्यक्षात दराचा निर्णय तेल कंपन्या घेतात. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील नियंत्रण आधीच काढून टाकले आहे.  यामुळे सरकारचे दरावर कोणतेही नियंत्रण नाही.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com