जी हिम्मत ३७० हटवताना दाखवली, तीच हिम्मत मराठा आरक्षणासाठीही दाखवा - Show the same courage you showed while deleting 370 for Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

जी हिम्मत ३७० हटवताना दाखवली, तीच हिम्मत मराठा आरक्षणासाठीही दाखवा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 मे 2021

त्यांनी दिलेले वकील घेऊनच आपण ही मराठा आरक्षणासंदर्भातील लढाई लढतो आहोत. 

मुंबई  ः जम्मू काश्मीरमधील ३७० कलम (Article 370) हटवतान जी हिम्मत आणि संवेदनशीलता दाखवली, तीच हिम्मत आता मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) केंद्र सरकारने दाखवावी, असे आवाहन करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या दरबारात टोलवला आहे.

सर्वोच्च न्यालयालयाने आज मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर रात्री राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला वरील आवाहन दिले. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा मागच्या सरकारसह सर्वांनी मिळून एकमुखीपणे केला होता. पण, दुर्दैवाने आज सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला आहे. काहींनी आरोप केले आहेत की आम्ही उच्च न्यायालयात हा कायदा टिकवला. पण, या सरकारला सुप्रीम कोर्टात तो टिकवता आला नाही. पण तसं नाही. कारण, त्यांनी दिलेले वकील घेऊनच आपण ही मराठा आरक्षणासंदर्भातील लढाई लढतो आहोत. 

हेही वाचा : सोलापूरसाठी खलनायक ठरलेल्या भरणेंना राष्ट्रवादी पालकमंत्रीपदावरून हटवणार का?

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना त्यात आपल्याला मराठा आरक्षण मिळण्याबाबतचा मार्ग दाखवला आहे. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा आहे. त्यामुळे माझी आता केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती आहे की, जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवताना जी हिम्मत दाखवली तीच हिम्मत मराठा आरक्षणबाबत दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी शहाबानू खटला आणि अट्रोसिटी प्रकरणात जे निकाल दिले आहेत. ते संसदेने आपल्या अधिकाराचा वापर करून बदलले. त्या प्रकरणात जी संवेदनशीलता दाखवली. तीच आता दाखवावी. आता तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की हा अधिकार आपला आहे. महाराष्ट्रात सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला हा निर्णय घेतला, त्यावेळेप्रमाणे आताही एकत्र येऊन आम्ही केंद्र सरकारला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आता जादा वेळ न लावता हा निर्णय घ्यावा. त्यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भेटीची गरज असेल, तर आम्ही त्यांची भेटही घ्यायला तयार आहोत. 

मराठा समाजाला हात जोडून धन्यवाद देतो. त्यांनी हा निर्णय संयमाने घेतला. विशेषतः खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचा विशेष उल्लेख करेन. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहे. अजूनही आपली लढाई संपलेली नाही. जो संयम आणि शांतता यापूर्वी आपण दाखवली. तीच शांतता आणि संयम आताही दाखवावी. आग लावण्याचे काम करणाऱ्यांना बळी पडू नका. तुम्हाला तुमचे हक्क मिळवून देण्याची ग्वाही देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आश्वस्त केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख