सुशांत खामकर?...नव्हे ते सचिन वाझेच! - Sachen Waze Stayed in Mumbai Hotel on Bogus Name | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांत खामकर?...नव्हे ते सचिन वाझेच!

सुरज सावंत
मंगळवार, 23 मार्च 2021

सध्या अँटिलिया बाँब प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे मुंबईच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये रहात असल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आपली ओळख पटू नये, यासाठी ते सुशांत खामकर या नावाने या हाॅटेलमध्ये रहात होते, असे दिसून आले आहे

मुंबई : सध्या अँटिलिया बाँब प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे मुंबईच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये रहात असल्याचे एनआयए (NIA)च्या तपासात निष्पन्न झाले आहे. आपली ओळख पटू नये, यासाठी ते सुशांत खामकर या नावाने या हाॅटेलमध्ये रहात होते, असे दिसून आले आहे. (Sachen Waze Stayed in Mumbai Hotel on Bogus Name)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती.  त्यानंतर न्यायालयाने त्यांना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. सध्या त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. 

NIAने काल अँन्टीलिया स्फोटक प्रकरणी दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हाँटेलमध्ये कारवाई केली. या हाॅटेलमध्ये वाझे हे सुशांत सदाशिव खामकर या नावाने १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी रहात होते. NIAने त्यांचे बनावट आधार कार्डही ताब्यात घेतले आहे.वाझे मुंबईत घर असताना, पाच दिवस तेथे का रहात होते, त्यांना भेटायला तेथे कोण कोण आलं होतं, याचा तपास आता एनआयए करत आहे.

या गुन्ह्याचा कट हा या हाँटेलमघ्येच रचल्याचा 'एनआयए'ला संशय आहे. या हाॅटेलमधून काही बँगा ही जप्त करण्यात आल्या आहेत. या हाॅटेलात वाझेंना भेटायला कोण कोण आलं होतं याची ओळख पटवण्यासाठी हाॅटेलचे सीसीटिव्ही फुटेजही तपासले जाणार आहे. 

हे देखिल वाचा - अनिल देशमुखांवर पुन्हा बाँब

दरम्यान, अँटिलिया बाहेर स्फोटके ठेवलेल्या स्काॅर्पिओच्या परिसरात एक व्यक्ती पांढरा सदरा घालून तोंड झाकून गेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले होते. त्या दिवशीच्या 'सीन रिक्रिएशन'मध्ये वाझेचं ते असल्याची दाट शक्यता एनआयएने वर्तवली आहे. (Sachen Waze Stayed in Mumbai Hotel on Bogus Name)

गुन्ह्यातील इतर आरोपींनी वाझे घटनास्थळी सदरा घालून गेल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच सीन रिक्रिएशन करण्यात आलं. एनआयए सध्या या सीन रिक्रिएशनच्या अंतिम अहवालाची वाट पहात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख