वडेट्टीवारांनी काढली नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेतील हवा! - No need to take the issue of contesting elections on solo seriously now : Vijay Vadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

वडेट्टीवारांनी काढली नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेतील हवा!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

त्या वेळच्या परिस्थितीनुसार पक्षश्रेष्ठी ठरवत असतात.

अलिबाग : विधानसभेच्या निवडणुकांना आणखी सुमारे तीन वर्षांचा कालावधी आहे, त्यामुळे निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडी करून हा विषय आताच फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशा शब्दांत राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढण्याच्या घोषणेतील हवाच काढून घेतली. (No need to take the issue of contesting elections on solo seriously now : Vijay Vadettiwar)

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सातत्याने स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा वापरत आहेत. त्यावरून महाविकास आघाडीचे प्रमुख मानले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून आघाडीतील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भेटायला आलेल्या काँग्रेस नेत्यांनाही पवारांनी जाब विचारला होता. त्यानंतरही नाना आपल्या घोषणेवर ठाम आहेत. त्याच मुद्यावर वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाचे कार्यक्रम, आंदोलन, भेटीगाठी यापासून अलिप्त असणाऱ्या विजय वडेट्टीवर यांनी प्रदेशाध्यक्षांच्या विधानाला खोडणारे भाष्य केल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा : भाजप आमदार गायकवाडांच्या मुलाला ३९ लाखांना गंडविले

दरम्यान, अलिबाग येथे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडत असतात. ती मांडत असतानाच त्यांनी आगामी निवडणुका ह्या स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. पण, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आणखी सुमारे तीन वर्षांचा अवधी आहे. आघाडी करून लढायचे कि स्वतंत्रपणे हे त्या वेळच्या परिस्थितीनुसार पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. त्यामुळे तो विषय आत्ताच फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

वडेट्टीवर यांनी नाना पटोले यांच्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्ये केल्याने स्वबळावर निवडणुका लढविण्याबाबत काँग्रेस पक्षात एकवाक्यता नसल्याचे दिसते. पटोले यांच्या घोषणेबाबत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे काँग्रेस खरंच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पक्षाचा विस्तार करण्यासाठीच नाना पटोले यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी आत्तापर्यंत कोणावरही टीक केलेली नाही. पण, पटोले यांच्या भाषणाचा वेगळा अर्थ काढून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे विरोधकांकडून दाखविण्याचा उद्योग सुरू आहे. काहीतरी करून महाआघाडीत भांडणे लावण्याची संधी भारतीय जनता पक्षाचे लोक शोधत आहेत. परंतु तीनही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी या वेळी बोलताना केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख