मुंबईला प्रथमच लाभले टॉपचे तीन मराठी पोलिस अधिकारी  

मुंबईला मराठी पोलिस आयुक्त तथा सीपी देण्याच्या शिवसेनेच्या आग्रहातून एक वेगळा विक्रम झाला आहे.
  Hemant Nagarale, Vishwas Nangre-Patil, Milind Bharamba .jpg
Hemant Nagarale, Vishwas Nangre-Patil, Milind Bharamba .jpg

पिंपरी : मुंबईला मराठी पोलिस आयुक्त तथा सीपी देण्याच्या शिवसेनेच्या आग्रहातून एक वेगळा विक्रम झाला आहे. कधी नाही, ते मुंबईचे तीनही टॉपचे पोलिस अधिकारी हे सध्या मराठी आहेत. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, पोलिस सहआयुक्त तथा जॉंईट सीपी (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील) आणि पोलिस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे हे तिघेही मराठी आयपीएस आहेत.

मुंबई पोलिस दलात आयुक्तांच्या दिमतीला पाच सहआयुक्त आहेत. त्यातील सहआयुक्त गुन्हे तसचे कायदा व सुव्यवस्था ही दोन पदे तुलनेने महत्वाची आहेत. त्याच पदावर सध्या मराठी व्यक्ती आहेत. तर, इतर तीन ठिकाणी सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूकला यशस्वी यादव, तर प्रशासनात नवल बजाज आहेत.

सचिन वाझे प्रकरणातून परमवीरसिंह यांची वर्षभरातच तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नगराळे यांनी काल पदभार स्वीकारला. त्यामुळे संजय बर्वे यांच्यानंतर पुन्हा एकदा मुंबईला मराठी सीपी मिळाले.

दहा महिन्यांवर आलेली मुंबई महापालिकेची निवडणूक ध्यानात घेऊन तेथे मराठी सीपी आणण्याचा राज्यातील सत्ताधारी शिवसेना व त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता. त्यामुळे सीपीच नाही, तर त्याखालोखाल महत्वाच्या दोनही पदांवर म्हणजे जॉंईट सीपी (कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे) अशा मुंबई पोलिस दलातील पहिल्या तिन्ही मोठ्या व महत्वाच्या पदांवर मराठी आयपीएस अधिकारी आले आहेत. या तिघांत व त्यातही दोनही सहआयुक्तांत अनेक साम्ये आहेत. 

तिघांनीही यापूर्वी मुंबईत काम केलेले आहे. तेथील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचीही त्यांना बारीक माहिती आहे. तिघांनाही राष्ट्रपतींचे पदक मिळालेले आहे. तिघांत नांगरे-पाटील हे अधिक सेलिब्रिटी आयपीएस अधिकारी आहेत. त्यातही तरुणांत त्यांची जास्त क्रेझ आहे. स्पर्धा परिक्षेतील तरुणांना ते मार्गर्शनपर भाषणे देत असतात. स्पर्धा परीक्षेची व त्यातही युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थ्यांवर नांगरे-पाटलांच्या मन ''में है विश्वास'' या आत्मकथन आणि ''कर हर मैदान फतेह'' या पुस्तकांचे मोठे गारूड आहे. 

नगराळे हे १९८७ च्या, तर नांगरे-पाटील आणि भारंबे हे १९९७ च्या आयपीएस बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. तिघांनीही नक्षलग्रस्त भागात चांगले काम केले आहे. नगराळे यांची, तर पहिली पोस्टिंग हीच मूळात नक्षल भागात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात राजूरा येथे झालेली होती. दोघा सहआयुक्यांची एकाच दिवशी एकाच वर्षी म्हणजे २ सप्टेंबर २०२० ला मुंबई पोलिस दलात नियुक्ती झालेली आहे. 

मुंबई अतिरेकी हल्याचा सामना या तीनही मराठी आयपीएस अधिकाऱ्यांनी केलेला आहे. दोन्ही सहआयुक्त हे त्यावेळी अतिरिक्त आयुक्त म्हणजे अॅडीशनल सीपी होते. भारंबे हे उत्तर मुंबईचे तर, नांगरे पाटील हे दक्षिण मुंबईचे अतिरिक्त आयुक्त होते. तर, नगराळे हे त्यावेळी प्रतिनियुक्तीवर राज्य वीज वितरण कंपनीत (एमएसईडीसीएल) होते. तरीही त्यांनी हल्यातील जखमींना मदत केली. शिवाय आरडीएक्स असलेली बॅग शोधून बॉम्ब निर्मूलन पथकाव्दारे ती निकामी केली होती. नंतर ताजमध्ये जाऊन तेथेही त्यांनी मदतकार्य केले होते.

मुंबईत येण्यापूर्वी नांगरे-पाटील हे नाशिकचे पोलिस आयुक्त होते. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत उपायुक्त (डीसीपी) आणि नगर येथे एसपी म्हणून काम केलेले आहे. मुंबईवर (२६ नोव्हेंबर २००८) ला अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळी त्याच दक्षिण प्रादेशिक विभागाचे नांगरे-पाटील अतिरिक्त पोलिस आयुक्त होते. दोन पोलिस आणि अंगरक्षकासह ते अतिरेकी घुसलेल्या गेटवे ऑफ इंडियासमोरील ताज हॉटेलात बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय शिरले होते.

मशीनगन व बॉम्ब असलेल्या अतिरेक्यांचा सामना त्यांनी पिस्तूलाने केला होता. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते. वडील सरपंच असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या कोकरूड गावचे ते रहिवासी आहेत. पुणे ग्रामीणचे एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील रेव्ह पार्टीवर (ता. ४ मार्च २००७) ला त्यांनी धाड टाकून २८७ तरुण-तरुणींना अटक केल्यामुळे ते चांगलेच प्रकाशझोतात आले होते.

भारंबे हे मुंबईत येण्यापूर्वी ठाण्यात सहआयुक्त होते. त्यापूर्वी त्यांनी नगर, सोलापूर, सांगली, नाशिक ग्रामीणमध्ये काम केले आहे. गोंदीयात एसपी असताना त्यांनी नक्षलवादाचा यशस्वी मुकाबला केलेला आहे. तर, सांगलीत काम करताना एसपी ऑफिसच नाही, तर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी त्यांनी आयएसओ नामांकित केली होती. नांदेड परिक्षेत्राचे (रिजन) पोलिस महानिरीक्षक (आयजी) आणि औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

नगराळे यांनी एसपी म्हणून सोलापूर, रत्नागिरी, सीआयडी, सीबीआय, तर आयुक्त म्हणून नवी मुंबईत २०१६ ते २०१८ मध्ये चांगले काम केलेले आहे. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळले होते. मुंबईत अतिरिक्त आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग म्हणजे ईशान्य मुंबई) आणि सहआयुक्त (प्रशासन) म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. २०१४ मध्ये काहीकाळ मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. ब्लॅक बेल्ट असलेले नगराळे हे चांगले गोल्फ खेळाडू आहेत. 
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com