स्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंची सडेतोड भूमिका...
uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : स्वबळ हा आमचा हक्क आहे. नारा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे स्वबळ हे आहे. हे स्वबळ निवडणुकीपुरते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळ हा सेनेचा आत्मा असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतील काॅंग्रेस पक्ष स्वबळाची भाषा बोलत असताना ठाकरे यांचे हे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचविणारे ठरले आहे.

ठाकरे यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणात स्वबळ हा शब्द इतका वेळ आला की ते सुद्धा म्हणाले की शिवसेनेचा स्वबळाचा नारा, असे काही बातम्या करतील. पण मी सांगतो स्वबळ हा आमचा हक्क आहे. शिवसेना नसती तर भारतातच नव्हे तर मुंबईतही मराठी माणसाची अवहेलना झाली असती. शिवसेनेने आत्मविश्वास दिला. त्यामुळे मराठी माणसाची मान उंचावली. सत्तेसाठी लाचार होणार नाही, हे आपले व्रत आहे. आपण उगागच कोणाची पालखीही वाहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्यांची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. भलत्यासलत्यांची पालखी वाहणार नाही. आम्ही आमच्या पावलांनी वाटचाल करू. हेच शिवसेनेचे ब्रीद आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना जरून लढेन आणि हिंदुत्वासाठीही लढेन. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे. आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही, हे माझे वाक्य नाही तर शिवसेनाप्रमुखांचे आहे. हे वाक्य मी विधीमंडळात बोललो होतो. त्यावर मी आजही कायम आहे. आपल्या संघराज्याचा पाया हा भाषावर प्रांतरचनेचा आहे, हे आपण विसरता कामा नये. प्रादेशिक अस्मिता हा आपल्या संघराज्याचा पाया आहे. ती आपण विसरता कामा नये. शिवसेनेवर जेव्हा धर्मांध, प्रांतवाद याचे आरोप होतात. मात्र जात, धर्म यापलीकडे जाऊन विचार करणारा शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही.

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयाचा उल्लेख करत तेथील जनतेने आपले मत खुलेपणाने मांडले, याचे कौतुक करावेसे वाटले. सत्व काय असते, हे तेथील जनतेने दाखवून दिले. वंदे मातरम, हा क्रांतीचा मंत्र बंगालने दिला. प्रादेशिक अस्मिता कशी जपावी, याचे उदाहरणही बंगालने घालून दिले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा सेनाप्रमुखांचा, माझ्या आजोबांचा वारसा आहे. हे हिंदुत्व आम्ही सोडलेले नाही. राज्याचा विकास करणे, गरिबांचा आशिर्वाद घेणे यासाठी जर काही तडजोडी कराव्या लागत असल्या म्हणजे हिंदुत्व सोडले असे नव्हे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राजकारण हे वळतवळत चालले आहे. ज्या उंचीची लोक राजकारणात आहे, ते पाहता राजकारणाचे विकृतीकरण सुरू आहे. सत्ता पाहिजे तर तुम्हाला घ्या. सत्ता हे माझ्यासाठी कधी स्वप्न नव्हते. पण जबाबदारी म्हणून मी ते स्वीकारलेले आहे, असाही दावा केला.

आम्हाला बदनाम करण्याचा कट आहे. मात्र आरोप करणाऱ्यांनी कधी स्वतःचे तोंड आरशात पाहिले आहे काय,  असा सवाल त्यांनी केली. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून राजकीय संदेश न देता आरोग्याचा संदेश देणारा शिवसेना हा एकमेव विरोधी पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या घरात, गावात कोरोना येणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com