महाराष्ट्रात लॅाकडाऊन का वाढणार? ही आहेत दोन महत्वाची कारणं...

बुधवारपर्यंत राज्यात सुमारे तीनलाख सक्रीय रुग्ण होते. त्यापैकी सुमारे २० हजार रुग्ण रुग्णालये किंवा कोविड सेंटरमध्ये आहेत.
Maharashtra increased lockdown as the number of patients in some districts could not be controlled
Maharashtra increased lockdown as the number of patients in some districts could not be controlled

मुंबई : राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ठाकरे सरकारने लॅाकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही प्रमाणात निर्बंध शिथील करून नागरिकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. कोणते निर्बंध शिथील होणार, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) टास्क फोर्सशी चर्चा करून घेतील. पण लॅाकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यामागे दोन महत्वाची कारणं सरकारकडून सांगितली जात आहेत. (Maharashtra increased lockdown as the number of patients in some districts could not be controlled)

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बुधवारपर्यंत राज्यात सुमारे तीन लाख सक्रीय रुग्ण होते. त्यापैकी सुमारे २० हजार रुग्ण रुग्णालये किंवा कोविड सेंटरमध्ये आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ९३ टक्के आहे. तर मृत्यूदर १.६२ टक्क्यांवर गेला आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्या कमी होत असली तर मृत्यूदर किंचितसा वाढला आहे. नवीन आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्या २५ ते ३० हजारांच्या जवळपास राहत आहे. मागील महिन्यात हा आकडा दुपटीहून अधिक होता. लॅाकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. 

राज्यातील पुणे, मुंबईसारख्या महानगरांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आता अन्य जिल्ह्यांमध्ये हा आकडा कमाली वाढू लागला आहे. त्यामुळे राज्याची सरासरी रुग्णसंख्या वेगाने कमी होताना दिसत नाही. हे लॅाकडाऊन वाढविण्यामागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होत असला तरी 10 ते 15 जिह्यांमध्ये रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. लॅाकडाऊन एकदम रद्द केल्यास ही वाढ आणखी वेगाने होऊ शकते. तसेच रुग्ण कमी झालेल्या शहरांमध्येही आकडे वाढून पुन्हा लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेतील उच्चांक आणि सध्याची स्थिती जवळपास सारखीच आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यात आढळून येणारी दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास एवढीच होती. त्यावेळी रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले होते. दुसऱ्या लाटेतही दैनंदिन रुग्णसंख्या 65 हजारांच्या पुढे गेल्यानंतर बेडसाठी रुग्णांना झगडावे लागले. तसेच ऑक्सीजन व औषधांचाही मोठा तुटवडा जाणवला. लॅाकडाऊननंतर ही स्थिती आटोक्यात आली आहे. लॅाकडाऊन शिथील केल्यास पुन्हा पूर्वीची स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून लॅाकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्याने शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

राज्य सरासरीपेक्षा अधिक पॉझीटिव्हीटी रेट असणारे जिल्हे

सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com