The cyclone has caused severe damage to houses in West Bengal and Odisha
The cyclone has caused severe damage to houses in West Bengal and Odisha

Yaas Cyclone : तीन लाख संसार उघड्यावर, चार जणांचा मृत्यू

ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यास यक्रीवादळाने धडक दिली.

कोलकता : बंगालच्या उपसागरातील यास चक्रीवादळाने (Yaas Cyclone) पश्चिम बंगाल व ओडिशातील अनेक भागांत हाहाकार उडवला. अनेक गावे पाण्याखाली गेली असून वादळी वारा व पावसाने तीन लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. वादळापासून बचावासाठी या दोन राज्यांसह झारखंडमधील सुमारे 21 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवालं लागलं. आतापर्यंत चक्रावादळाने चौघांचा बळी घेतला आहे. (The cyclone has caused severe damage to houses in West Bengal and Odisha)

ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यास यक्रीवादळाने धडक दिली. यावेळी ताशी 155 ते 165 किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच मुसळधार पाऊस कोसळल्याने किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये 24 तासांत 200 मिमीहून अधिक पाऊस कोसळला. बंगालमध्येही अनेक जिल्ह्यांत हीच स्थिती होती. त्यातच समुद्राचे पाणीही अनेक गावांमध्ये घुसले. त्यामुळं ही गावं जलमय झाली होती.

बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील दीघा, शंकरपुर, मंदारमनी, दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बकखाली, संदेशकाली, सागर, फ्रेजरगंज, सुंदरबन आदी भागाला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसाने लाखो घरांचे नुकसान झाले आहे. 134 बंधारे फुटले असून शेकडो किलोमीटरचे रस्ते उखडले आहेत. ओडिशातील भद्रक व बालासोर जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये त्सुनामीसारखी स्थिती निर्माण झाली होती. काही गावांमध्ये समुद्राचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

एनडीआरएफ व लष्कराकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून दोन्ही राज्यांना तातडीने मदत पाठविली जात आहे. पाण्यात अडकलेल्या लाखो लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे. अनेक झाडे घरे, रस्त्यांवर पडली ती हटवण्याचे काम सुरू आहे. वीज यंत्रणेचीही मोठे नुकसान झाले असून ते पूर्ववत केले जात आहे. रस्ते दुरूस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. या भागातील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, वादळची तीव्रता कमी झाली असली तरी अजूनही झारखंड, बिहार, छत्तीसगढ या राज्यांत ते सक्रीय आहे. सध्या झारखंडमध्ये वादळाचा केंद्रबिंदु असल्याने अनेक भागात जोराचे वारे वाहत असून मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांवरही वादळाचे सावट आहे. पुढील तीन दिवस पूर्व विदर्भातील काही भाग, कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर तसेच अकोला, जालना, लातूर, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांतील तुरळक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com