महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांवर यास चक्रीवादळाचे ढग; काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा - It is likely to rain in some districts of Maharashtra due to the cyclone | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांवर यास चक्रीवादळाचे ढग; काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यास यक्रीवादळाने धडक दिली.

मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या यास (Yaas Cyclone) चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाखो लोकांना याचा फटका बसला असून अनेक गावे जलमय झाली होती. आता हे वादळ झारखंड राज्यावर घोंघावत असून त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (It is likely to rain in some districts of Maharashtra due to the cyclone)

ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास यास यक्रीवादळाने धडक दिली. यावेळी ताशी 155 ते 165 किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच मुसळधार पाऊस कोसळल्याने किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये 24 तासांत 200 मिमीहून अधिक पाऊस कोसळला. बंगालमध्येही अनेक जिल्ह्यांत हीच स्थिती होती. त्यातच समुद्राचे पाणीही अनेक गावांमध्ये घुसले. त्यामुळं ही गावं जलमय झाली होती. 

हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय : म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी पाच कंपन्यांना परवाना

वादळची तीव्रता कमी झाली असली तरी अजूनही झारखंड, बिहार, छत्तीसगढ या राज्यांत ते सक्रीय आहे. सध्या झारखंडमध्ये वादळाचा केंद्रबिंदु असल्याने अनेक भागात जोराचे वारे वाहत असून मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांवरही वादळाचे सावट आहे. पुढील तीन दिवस पूर्व विदर्भातील काही भाग, कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर तसेच अकोला, जालना, लातूर, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांतील तुरळक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते चक्रीवादळ पूर्णपणे ओसरले आहे. मागील वर्षीही राज्याला निसर्ग वादळाचा तडाखा बसला होता. मागील काही वर्षांत अरबी समुद्रात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळे येत आहेत. हा परिणाम हवामान बदलाचा असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

1990 पासून अरबी समुद्रांत तयार होणाऱ्या वादळांच्या ट्रेंड वाढला आहे. एका अभ्यासानुसार हवामान बदलामुळे वादळांची तीव्रता वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण यावरील पुरेसा अभ्यास व विश्लेषण नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख