...अन्‌ गृहमंत्री अनिल देशमुखांनी हात जोडले !

देशमुख यांनी पोलिस खात्यात सारे काही आलबेल नसल्याची कबुलीही दिली.
Home Minister Anil Deshmukh met to Sharad Pawar in Delhi
Home Minister Anil Deshmukh met to Sharad Pawar in Delhi

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणामुळे उठलेल्या वादळाने मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यांतर आता अनिल देशमुख यांच्याकडील गृहखाते काढून घेण्याबाबतची चर्चा सुरू झाली. त्यातच देशमुख हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेल्याने चर्चेला आणखी बळ मिळत आहे. कारण, पवारांना भेटून आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या खातेबदलाबाबत विचारले असता देशमुखांनी चक्क हात जोडून विषय टाळत काढता पाय घेतला. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर दिल्लीत सुमारे दीड तास चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, "विदर्भामधील नागपूर येथील मिहान प्रकल्पात मोठी, आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रीज येण्याच्या विचारात आहे. ती इंडस्ट्रीज विदर्भात यावी, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांची मदत व्हावी, यासाठी त्यांची भेट घेतली. याबाबत केंद्रीय पातळीवर मदत करावी, अशी विनंती त्यांना केली. याशिवाय मिहान प्रकल्पाबद्दलही मी त्यांना संपूर्ण माहिती दिली.'' 

"विदर्भातील उद्योगांबाबत चर्चा करत असतानाच मुंबईत सध्या सुरू असलेल्या प्रकरणाबाबतचीही माहिती मी त्यांना दिली. मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ज्या जलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या, त्याबाबतही त्यांनी माझ्याकडून माहिती जाणून घेतली,'' असे देशमुख यांनी नमूद केले. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके व मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. राज्य सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासामध्ये जे दोषी आहेत, त्यांची नावे यायला हवीत. एनआयएच्या अंतिम चौकशी अहवालानतर पुढील कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

दरम्यान, देशमुख यांनी काल एका मुलाखतीत अँटिलिया स्फोटक प्रकरणात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्याची कबुली दिली आहे. एटीएस (ATS) आणि एनआयएकडून (NIA) याचा तपास सुरू आहे. चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल,'' असे सांगत देशमुख यांनी पोलिस खात्यात सारे काही आलबेल नसल्याची कबुलीही दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com