राठोडांच्या राजीनाम्यानंतर वनखात्यासाठी लॅाबिंग : बाजोरिया, देशमुख, रायमुलकर आघाडीवर  - Sanjay Rathore spoke after his resignation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

राठोडांच्या राजीनाम्यानंतर वनखात्यासाठी लॅाबिंग : बाजोरिया, देशमुख, रायमुलकर आघाडीवर 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता, वन खात्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता, वन खात्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर, शिवसेनेमध्ये मंत्रीपद मिळण्यासाठी लॅाबिंग सुरु झाले आहे. यामध्ये गोपीकिशन बाजोरिया, नितीन देशमुख, संजय रायमुलकर यांची नावे चर्चेत आहेत. विदर्भ आणि मुंबईतील नेत्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.

जोपर्यंत वनखात्याचा मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती होत नाही. तोवर वन खात स्वतः मुख्यमंत्री पाहणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या वनमंत्र्यांची घोषणा केली जाईल असे सांगण्यात येत आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून शंभूराजे देसाई यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

पूजाच्या आजीची वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार; राठोडांच्या अडचणी वाढणार 

गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे विधानपरिषद आमदार आहेत. ते अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातून विधानपरिषदेवर 2004, 2010 आणि 2016 असे सलग तीनवेळा निवडणून गेले आहेत.  बाजोरिया यांचा अकोट, हिवरखेडमध्ये कापूस आणि लघु उद्योग विकासात मोठा वाटा आहे.  शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी ते एक आहेत. मातोश्रीवरही त्यांचे चांगले वजन असल्याचे बोलले जाते. 

संजय रायमुलकर सलग तिसऱ्यांदा शिवसेना आमदार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडणून आलेले आहेत. शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मंत्रीपदी कोणाला संधी मिळते ते पाहावे लागणार आहे.   

दरम्यान ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात विरोधी पक्षाने अत्यंत घाणेरडे राजकारण करत माझ्याबरोबर समाजाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय, सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. प्रकरणातील सगळे सत्य बाहेर यावे, अशी माझीही इच्छा आहे'', अशी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली होती. 

मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न : चौकशीतून सत्य बाहेर आणाच 
 

दरम्यान, संजय राठोड दुपारी 2. 30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवास्थानी गेले होते. या वेळी राठोड आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली होती. विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता. १ मार्च) सुरु होत असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे विरोधकांनी सांगितले होते. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख